करोना विषाणू प्रतिबंधक लस तीन-चार महिन्यांमध्ये उपलब्ध होऊ  शकेल. त्यानंतर करोनायोद्धे आणि आरोग्यसेवकांचे प्राधान्याने लसीकरण केले जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी गुरुवारी दिली.

देशातील पाचपैकी दोन लशींच्या मानवी चाचण्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या असल्याच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन यांनी लशींसंदर्भात आशादायी माहिती दिली.

‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीने दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहेत. आता तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेतल्या जात आहेत. या चाचण्यांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी घेतला आहे. ते शुक्रवारी ही देशी बनावटीची लस टोचून घेणार आहेत. या लशीच्या चाचणीत सहभागी होणाऱ्यांना तीन डोस देऊन त्याचे निष्कर्ष तपासले जातात.

‘कोव्हॅक्सिन’ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी २६ हजार लोकांवर करण्यात येणार आहे. पहिल्या दोन टप्प्यांत प्रत्येकी एक हजार जणांवर लशीची चाचणी करण्यात आली होती. ‘ऑक्सफर्ड’च्या लशीच्या मानवी चाचण्या सीरम इन्स्टिटय़ूट करत असून तिसरा टप्पा पूर्ण होत आला आहे. ‘कॅडिला’ लसीचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे, तर रशियाच्या ‘स्पुटनिक’ लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्याही पुढील आठवडय़ापासून डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

करोनायोद्धय़ांच्या मुलांना वैद्यकीयच्या पाच जागा राखीव

करोनायोद्धय़ांच्या अपत्यांना वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमात पाच जागा राखीव ठेवण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. चालू शैक्षणिक वर्षांपासून (२०२०-२१) केंद्राच्या कोटय़ातून या जागा भरल्या जातील, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली. ५० लाखांचे विमाकवच देण्यासाठी निश्चित केलेल्या करोनायोद्धय़ांच्या व्याख्येचा आधार या विशेष गटातील प्रवेशासाठी घेतला जाईल. करोना रुग्णांना आरोग्य सेवा देणारे सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रांतील आरोग्यसेवकांचा करोनायोद्धय़ांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

राज्यात ५,५३५ नवे रुग्ण

राज्यात गुरुवारी करोनाचे ५,५३५ रुग्ण आढळले असून, १५४ जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णसंख्या १७ लाख ६३ हजार तर करोनाबळींची संख्या ४६,३५६ वर पोहोचली आहे. दरम्यान, देशात दिवसभरात ४५५७६ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ८९,५८,४८३ झाली आहे.

कृती आराखडा तयार!

देशांतर्गत लशींच्या मानवी चाचण्या अंतिम टप्प्यात असल्याने लसीकरणाचा कृती आराखडा तयार केला आहे. ‘ई-व्हॅक्सिन’ हे तज्ज्ञांसाठी चर्चेचे व्यासपीठही बनवण्यात आले आहे. त्याआधारे लशींसंदर्भातील माहितीचे आदानप्रदान केले जात असल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले.