News Flash

करोना लसीची किंमत किती असेल? पंतप्रधान मोदी म्हणाले…

जनतेला संबोधित करताना लसीच्या निर्मितीबद्दल दिली महत्त्वाची माहिती

भारतात अद्यापही करोनाचा प्रसार कमी झालेला नाही. करोनावर कायमस्वरूपी उपाय म्हणून लसींची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशातील करोनाची सद्यपरिस्थिती या विषयावर आज सर्वपक्षीय बैठक झाली. त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान मोदी होते. या बैठकीत सरकारकडून नजीकच्या भविष्यकाळात करोनाच्या लसीचे वितरण करण्याबाबत चर्चा झाली. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करत करोना लस कधी मिळेल आणि त्याची किंमत किती असेल यासंदर्भात माहिती दिली.

“सध्या जगभरात विविध कंपन्या करोनावरील लस वितरित करताना दिसत आहेत. त्या लसींची किंमत तुलनेने जास्त आहे. सर्व जग सध्या वाजवी दरातील परिणामकारक लसीची वाट पाहत आहेत. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष भारतात चालू असलेल्या संशोधनाकडेदेखील आहे. भारतात सुरू असलेलं संशोधन आता काही आठवड्यांत पूर्ण होईल आणि त्यानंतर लगेच संशोधकांनी हिरवा कंदील दाखवल्यावर लसीचे वितरण सुरू होईल. लसीची किंमत किती असेल? असा प्रश्न स्वाभाविक आहे. केंद्र सरकार यासंदर्भात राज्य सरकारांशी चर्चा करत आहे. लसीची किंमत ही जनस्वास्थ्याला प्राथमिकता देऊनच निश्चित केली जाईल आणि राज्य सरकार या निर्णयप्रक्रियेत सहभागी असेल”, असे पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

“राज्यांबरोबर झालेल्या चर्चेमधून अनेक महत्वाचे सल्ले मिळाले. सध्या देशामध्ये आठ लसींची चाचणी सुरु असून त्यापैकी तीन लसी या पूर्णपणे भारतीय बनावटीच्या आहेत. करोनासंदर्भातील लसीसाठी फारशी वाट पहावी लागणार नाही. पुढील काही आठवड्यांमध्ये लस उपलब्ध होईल. करोना लसीसाठी कंपन्यांची पूर्ण तयारी असून वैज्ञानिकांनी हिरवा कंदील दिल्यानंतर तातडीने लसीकरण सुरु केलं जाईल. करोना लसीकरणाच्या वेळी आजारी नागरिक आणि वृद्ध नागरिक यांना प्राधान्य दिलं जाईल. त्याचप्रमाणे फ्रण्ट लाइनवर काम करणाऱ्यांना म्हणजेच आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना लस देताना प्राधान्य दिलं जाईल. सर्व राजकीय पक्षांनी आणि देशातील नागरिकांनी या लसीकरणासंदर्भात सहकार्य करावं”, असे पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 1:43 pm

Web Title: corona vaccine price update revealed by pm narendra modi in all party meet also gives updates research on vaccine pune vjb 91
Next Stories
1 Hyderabad Election Result : टीआरएस, भाजपामध्ये ‘काँटे की टक्कर’
2 करोना लस कधी आणि सर्वात आधी कोणाला मिळणार?; पंतप्रधान मोदींनीच दिलं उत्तर
3 हैदराबाद महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाची मुसंडी; एमआयएम तिसऱ्या क्रमांकावर
Just Now!
X