News Flash

‘करोना लशीमुळे १० महिने संरक्षण’

सामाजिक अंतर व मुखपट्टी वापराच्या नियमांमध्ये लोकांनी ढिलाई दाखवली. अजूनही काही काळ लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावेत.

‘करोना लशीमुळे १० महिने संरक्षण’

लशीमुळे कोविड १९ विषाणूपासून ८ ते १० महिने संरक्षण मिळते, असे अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राचे (एम्स) संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. लशीमुळे विषाणूपासून नेमके किती काळ संरक्षण मिळते याबाबत अनेकांना शंका होत्या, पण आता त्या काही प्रमाणात दूर होत आहेत.  गुलेरिया यांनी सांगितले,  की लशीचे कुठलेही प्रमुख दुष्परिणाम नाहीत. कोविड १९ प्रतिबंधक लस विषाणूपासून आठ ते दहा महिने संरक्षण देते. किंबहुना  कदाचित संरक्षणाचा हा काळ जास्तही असू शकेल.

आयपीएस असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. करोनाची साथ आता संपली असे लोक समजून चालत होते व त्यांनी वर्तनात ढिलाई केली, त्यामुळे करोनाचे प्रमाण आता वाढताना दिसत आहे. ते पुढे म्हणाले, की करोना पुन्हा वाढण्याची अनेक कारणे आहेत. पण त्यात मुख्य कारण हे लोकांचे वर्तन व दृष्टिकोन हे आहे. करोना विषाणू गेला, आता काही होणार नाही असे लोकांना वाटले पण आम्ही लोकांना  सुरक्षा उपाय टाळून गाफील राहू नका असे  वेळोवेळी  स्पष्ट केले होते. पण सामाजिक अंतर व मुखपट्टी वापराच्या नियमांमध्ये लोकांनी ढिलाई दाखवली. अजूनही काही काळ लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावेत.

निती आयोगाचे आरोग्य सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितले, की संसर्गाची साखळी थांबली पाहिजे. त्यासाठी लस हे एक साधन आहे, पण तरी सुरक्षित उपायांचा अवलंब टाळून चालणार नाही. कोविड १९ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही व त्यात ढिलाई दाखवली, हे संसर्ग वाढण्याचे प्रमुख कारण आहे.

जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याच्या मुद्द्यावर त्यांनी सांगितले, की लस मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे अग्रक्रमातील व्यक्तींना लस दिली जात आहे. जर लशीचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर झाला तर लसीकरण सर्वांचेच केले जाईल. सध्या मोठ्या प्रमाणात लशी उपलब्ध नाहीत त्यामुळे सर्वांचे लसीकरण करता येत नाही. जगातील अनेक देश अग्रक्रमाच्या गटातील लोकांचे लसीकरण करण्यापलीकडे जाऊ शकले नाहीत याचे कारण तेच आहे. सह आजारातील व्यक्ती व वृद्ध व्यक्ती यांच्यात मृत्यूचा दर जास्त दिसून आला आहे. या लोकांनी लस घेण्यात दिरंगाई करू नये. इतरांपेक्षा त्यांना लशीची अधिक गरज आहे.

दरम्यान, आतापर्यंत देशातील चार कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले असून सध्याच्या स्थितीत साठ वर्षे वयावरील व्यक्ती व ४५-५९ वयोगटातील सह आजाराच्या व्यक्ती यांचे लसीकरण करण्यात येत आहे.

कोव्हॅक्सिन की कोव्हिशिल्ड? कोणती लस घ्यावी?

लशीच्या परिणामकारकतेबाबत गुलेरिया यांनी सांगितले, की कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड या दोन लशींचा विचार केला तर त्या दोन्हींमुळे समान प्रमाणात प्रतिपिंड तयार होतात. त्यांची संख्याही जास्त असते. जी लस उपलब्ध असेल ती घेण्यास हरकत नाही. कारण दोन्ही सारख्याच प्रभावी आहेत. त्यांची परिणामकारकता व विषाणूपासून मिळणारे दीर्घकालीन संरक्षण सारखेच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2021 1:31 am

Web Title: corona vaccine protects for 10 months akp 94
Next Stories
1 इम्रान खान यांना करोनाची लागण
2 रेशन योजनेला कोणतेही नाव देणार नाही, अरविंद केजरीवाल याचे केंद्राला उत्तर
3 कोविड -१९ दरम्यान केलेल्या अतुलनीय कार्यासाठी सोनू सूदला स्पाइसजेटने केले सन्मानित
Just Now!
X