देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना स्पुटनिक व्ही लस कधी मिळणार हा प्रश्न वारंवार विचारला जात होता. आता या प्रश्नाला पूर्णविराम लागला असून स्पुटनिक व्ही लस पुढील आठवड्यापासून मिळणार असल्याची माहिती नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिली आहे. स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप भारतात आली आहे. दुसरी खेप उद्या भारतात पोहोचणार आहे.

‘स्पुटनिक व्ही लस भारतात आली आहे. मला सांगण्यात आनंद वाटत आहे की, पुढच्या आठवड्यापासून ही लस भारतात मिळण्यास सुरुवात होईल. रशियातून आलेल्या लशींची लवकरच विक्री सुरु होईल.’, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी सांगितलं आहे.

स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप १ मे रोजी भारतात आली होती. आता लशीची दुसरी खेप उद्या भारतात पोहोचणार आहे. भारतात स्पुटनिक व्ही लशीची निर्मिती रेड्डीज लॅबोरेटरीज करणार असून भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लशीस केंद्रीय औषध प्रमाणन व नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे. या लसीचं उत्पादन जुलै महिन्यात सुरु होईल असंही वीके पॉल यांनी सांगितलं. या लशीचे १५.६ कोटी डोस तयार केले जाणार आहेत. तर भारतीयांसाठी ऑगस्ट-डिसेंबर दरम्यान २१६ कोटी डोस तयार केले जातील.

Explained: नदीच्या पाण्यातून करोनाचा संसर्ग होऊ शकतो का?; समजून घ्या

भारताच्या औषध महानियंत्रकांनी जानेवारीत भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन व ऑक्सफर्ड—अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या सीरमने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड या लशींना मान्यता दिली होती. स्पुटनिक व्ही लस आयात करण्याची परवानगी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने मागितली होती. ही लस मे. गमालिया इन्स्टिटय़ूट यांनी तयार केली असून लशीच्या उत्पादनासाठी रेड्डीज लॅबोरेटरीजने रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांच्याशी करार केला आहे.