भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. कारण या व्हायरसची लागण झालेल्या भारतातील रुग्णांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. दिल्ली आणि हैदराबाद येथे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले असून त्यांच्या प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ज्या देशांमध्ये COVID-19 (कोरोना व्हायरस) या व्हायरसचा परिणाम झाला आहे, तिथून हे रुग्ण प्रवास करुन भारतात पोहोचले आहेत.

त्याचबरोबर तिसरा संशयीत रुग्ण राजस्थानमध्ये आढळून आल्याचे तिथल्या अधिकृत आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राजस्थानमध्ये एका इटलीच्या पर्यटकाची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या रुग्णाची प्राथमिक चाचणी निगेटिव्ह आली होती त्यानंतर पुन्हा चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली आहे.

दिल्लीत आढळून आलेल्या रुग्णावर सध्या सफदरजंग रुग्णालयात विशेष स्वतंत्र वॉर्डमध्ये उपचार सुरु आहेत. तो इटलीला जाऊन आला आहे. इटलीमध्ये या व्हायरचा मोठा प्रादुर्भाव झाला असून आजवर तिथं १६९४ रुग्ण आढळून आले आहेत तर त्यांपैकी ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती व्हिएन्नामार्गे एअर इंडियाच्या विमानाने २५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत दाखल झाली आहे.

तर हैदराबादमधील कोरोनाचा रुग्ण हा गेल्या आठवड्यात दुबईहून भारतात परतला. दुबईत आजवर कोरोनाची लागण झाल्याची १९ प्रकरणं समोर आली आहेत. ही व्यक्ती २० फेब्रुवारीला दुबईहून हैदराबादला परतली. त्यानंतर २२ फेब्रुवारीला ती बेंगळूरूला गेली तिथं त्या व्यक्तीनं पाच दिवस काम केलं. त्यानंतर २७ फेब्रुवारीला पुन्हा हैदराबादला पोहोचली.