करोनाचा विषाणू हवेतून पसरतो, याबाबत ३२ देशांतील २३९ वैज्ञानिकांनी दिलेल्या पुराव्यांना जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली असून करोनाची साथ वेगाने पसरत असल्याचे म्हटले आहे. करोनाचा विषाणू दोन मीटरपेक्षा जास्त पसरतो हा मुद्दाही मान्य करण्यात आला आहे.
करोनाचा विषाणू हवेत २३ फुटांपर्यंत पसरू शकतो असे आधीच सांगण्यात आले होते पण आरोग्य संघटनेने त्याकडे दुर्लक्ष केले होते. याचा अर्थ दोन मीटर शारीरिक अंतर ठेवण्याचा निकष हा फारसा प्रभावी नसल्याचे सिद्ध झाले असून बंदिस्त ठिकाणी उलट विषाणूचा धोका जास्त असल्याचे स्पष्ट होत आहे.
जगातील वैज्ञानिकांनी जे पुरावे दिले आहेत, ते आम्हाला मान्य असून त्याच्या अनुषंगाने आणखी अभ्यास करून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार असल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस ट्रेडॉस अधनोम घेब्रेसस यांनी सांगितले की, करोना साथ कमी होण्याची कुठलीही चिन्हे नसून ४ लाख नवीन रुग्ण गेल्या आठवडय़ात निष्पन्न झाले आहेत. पहिले ४ लाख रुग्ण होण्यास १२ आठवडे लागले होते, आता एक आठवडय़ात ४ लाख रुग्ण सापडले आहेत. यातून साथ वाढत असल्याचेच दिसत आहे. आपण अजून साथीची शिखरावस्था गाठलेली नाही. मृत्यूची संख्या वाढत असली, तरी काही देशांनी ती आटोक्यात ठेवली आहे.
सोमवारी २३९ वैज्ञानिकांनी असे म्हटले होते की, नाकातोंडातून शिंका व खोकल्यातून बाहेर पडणारे पाच मायक्रोमीटरचे कण हवेत बराच काळ राहतात. त्यामुळे विषाणू हवेत पसरतो. तो दहा मीटरपेक्षा जास्त अंतर प्रवास करतो.
नवीन मार्गदर्शक तत्त्वे लवकरच..
* जागतिक आरोग्य संघटनेचे तांत्रिक प्रमुख बेनेडेट्टा अॅलेग्रंझी यांनी सांगितले की, वैज्ञानिकांनी दिलेले पुरावे आम्हाला मान्य आहेत. या पुराव्यांकडे दुर्लक्ष न करता आम्ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करू.
* कोविड १९ च्या तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव यांनी सांगितले की, याबाबत आम्ही नवीन सूचना जारी करू. जे पुरावे देण्यात आले आहेत त्यात सकृतदर्शनी तथ्य आढळून आले आहे.
* आरोग्य संघटनेने आतापर्यंत मुखपट्टीचा (मास्क ) वापर, सामाजिक अंतर, हात साबणाने धुणे हे जे प्रतिबंधात्मक उपाय सांगितले आहेत, ते तो विषाणू हवेतून पसरत नाही हे गृहीत धरून सांगितले आहेत. त्यामुळे आता घरात मुखपट्टी वापरण्यासह नवीन सुधारणा कराव्या लागणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 12:11 am