चीनमध्ये आढळून आलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूने अमेरिकेसह जगातील डझनभर देशांमध्ये थैमान घातले आहे. जगातील सर्वच देश या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, भारतातही या विषाणुचा पहिला रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच चीनमध्ये या विषाणुने मृत्यू झालेल्यांची संख्या ८०वर पोहोचली आहे.

भारतात जयपूर येथे रविवारी कोरोनाची लागण झालेला एक संशयीत रुग्ण आढळून आला आहे. चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाला या आजाराची लागण झाली आहे. जयपूरमधील सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. भारतात परतल्यानंतर त्याच्यामध्ये या आजाराची लक्षणे दिसून आली आहेत.

राजस्थानचे आरोग्यमंत्री डॉ. रघू शर्मा यांनी सवाई मानसिंह वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला याबाबत खबरदारीचे आदेश दिले आहेत. चीनहून एमबीबीएसचे शिक्षण घेऊन भारतात परतलेल्या या संशयीत विद्यार्थ्यावर स्वतंत्र खोलीत उपचार केले जात आहेत. तसेच त्याच्या कुटुंबातील व्यक्तींच्या तपासणीचे निर्देशही देण्यात आले आहेत. महाविद्यालयाच्या प्रशासनाने या संशयीत रुग्णाचे नमुने पु्ण्यातील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) येथे तपासणीसाठी पाठवले आहेत.

दरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणुमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता ८० वर पोहोचला आहे. तसेच २३०० रुग्णांमध्ये या विषाणुची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथील हुबेई प्रांताची राजधानी असलेले वुहान हे शहर या विषाणुच्या संक्रमणाचे प्रमुख केंद्र आहे. हुबेईच्या महापौरांनी रविवारी सांगितले की, या विषाणुमुळे आजवर ५६ लोकांचा मृत्यू झाला आहे. १,९७५ लोकांमध्ये या विषाणुचे संक्रमण झाल्याची अधिकृत नोंद आहे. त्याचबरोबर शहरात १००० नवे रुग्ण असल्याची शक्यता आहे.