भारतातील वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये करोनाचा विषाणू सापडला असल्याची माहिती भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने दिली आहे. केरळ, हिमाचल प्रदेश, पुडुचेरी, तामिळनाडू या राज्यांमध्ये आढळणाऱ्या प्रजातीत करोना विषाणूचे(बीटीसीओव्ही) अस्तित्व सापडले  आहे.

या वटवाघळातील करोना विषाणू माणसात पसरल्याचे कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत, किंबहुना वटवाघळात सापडलेले करोना विषाणू व माणसातील करोना विषाणू यांचा  काही संबंध नाही, असे पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या वैज्ञानिक डॉ. प्रज्ञा डी यादव यांनी केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रीसर्च या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यात म्हटल्यानुसार भारतातील रोसेट्स व पेटिरोपस या दोन प्रजातीत करोनाचा विषाणू (बीटीसीओव्ही— वटवाघळातील करोना विषाणू)  दिसून आला आहे.

केरळ, हिमाचल प्रदेश, पुडुचेरी व तामिळनाडूत वटवाघळाच्या या प्रजाती सापडतात. या प्रजातीच्या एकूण ३५ वटवाघळांची तपासणी या संशोधनात करण्यात आली आहे. वटवाघळातील करोना विषाणू माणसात पसरलेला नाही असे सांगून यादव यांनी म्हटले आहे की, पेटिरोपस वटवाघळात केरळातील निपाचा विषाणूही २०१८ -१९ मध्ये आढळून आला होता. वटवाघळांमध्ये अनेक प्रकारचे विषाणू असतात. त्यातील काही माणसातही रोगकारक ठरतात.

भारतात निपाचा संबंध पेटिरोपस वटवाघळांशी असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे त्यामुळे आताचा करोना विषाणू २ (सार्स सीओव्ही २)विषाणूही वटवाघळातून माणसात पसरल्याचा संशय होता. त्याबाबत अभ्यास करण्याचा हेतू या संशोधनात होता.

त्याबाबतचा शोधनिबंध ‘डिटेक्शन ऑफ करोनाव्हायरस इन पेटिरोपस अँड रोसेट्स स्पेसीज ऑफ बॅट्स फ्रॉम डिफरंट स्टेटस ऑफ इंडिया’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे.