करोनाच्या अत्यंत संक्रमणशील असलेल्या डेल्टा या उत्परिवर्तीत विषाणूमुळे ब्रिटनमध्ये करोनाची तिसरी लाट सध्या सुरू आहे, असे ब्रिटिश सरकारला लसीकरणाबाबत सल्ला देणाऱ्या एका तज्ज्ञाने शनिवारी म्हटले आहे.

प्रोफेसर अ‍ॅडम फिन हे लसीकरण आणि प्रतिरोधनिर्मिती समितीवरील तज्ज्ञ आहेत. त्यांनी ‘बीबीसी’ला सांगितले की, ब्रिटन हा सध्या लसीकरणाची लक्ष्यपूर्ती करणे आणि डेल्टा विषाणू या आव्हानांचा एकाचवेळी सामना करीत आहे. करोनाचा डेल्टा प्रकार हा प्रथम भारतात दिसून आला होता.

ते म्हणाले की, सध्या रुग्णवाढ होत आहे, पण ती यापेक्षा अधिक वेगाने होणार नाही अशी अपेक्षा आपण ठेवू. पण ही तिसरी लाट आता सुरू आहे, असे ठामपणे म्हणता येईल.

आपला लसीकरण कार्यक्रम, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना दुसरी मात्रा देणे यावर आपण डेल्टाची ही तिसरी लाट कितपत रोखू शकतो, हे प्रामुख्याने अवलंबून आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ब्रिटनमध्ये सध्या सर्व प्रौढ व्यक्तींचे लसीकरण केले जात आहे. सध्या ज्या वेगाने लसीकरण सुरू आहे, तो डेल्टाचे आव्हान परतवून लावण्यासाठी पुरेसा आहे काय, असे त्यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सांगितले की, यावर ठामपणे काही सांगता येणार नाही, पण आशावादी राहण्यास हरकत नाही. कारण राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, रुग्णसंख्येत वाढ दिसत असली तरी ही वाढ आम्ही गेल्या आठवड्यात वर्तविलेल्या अंदाजाइतकी झालेली नाही. त्यामुळे आपली लसीकरण मोहीम आणि डेल्टाचे संक्रमण यांच्यातील स्पर्धा सुरू झाली आहे. जेवढ्या लवकर आपण लसीकरण पूर्ण करू शकू, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना दुसरी मात्रा देऊ शकू, तेवढ्या कमी प्रमाणात रुग्णांना रुग्णालयांत ठेवण्याची गरज कमी भासेल. ही एक प्रमुख बाब आहे, कारण याआधी केवळ याच बाबींमुळे स्थिती गंभीर झाली होती.  ज्येष्ठांचे लसीकरण पूर्ण केले, रुग्णालयांत दाखल करण्याची गरज  कमी  ठेवण्यात यशस्वी झालो, मृत्यूचे प्रमाण वाढले नाही, तर स्थिती पूर्वपदावर येऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

डेल्टा विषाणूची चिंता

  •  राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, देशातील ५४० लोकांपैकी एकजण डेल्टा विषाणूमुळे बाधित आहे.
  •  पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या म्हणण्यानुसार, लशीची एक मात्रा घेतली असली तरी करोनाबाधित होण्याची (डेल्टासह) आणि रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासण्याची शक्यता ७५ टक्के कमी होते.