देशात गेल्या २४ तासांत करोनामुळे ४२०५ जण मृत्युमुखी पडल्यामुळे देशातील करोनामृत्यूंचा आकडा २,५४,१९७ वर पोहोचला आहे. याच कालावधीत आणखी ३,४८,४२१ जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या २,३३,४०,९३८ झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

सध्या उपचार घेत असलेल्या करोनाबाधितांची संख्या ३७,०४,०९९ इतकी झाली असून ती एकूण करोनाबाधितांच्या १५.८७ टक्के आहे, तर बरे होण्याचे प्रमाण ८३.०४ टक्के झाले आहे. आतापर्यंत १,९३,८२,६४२ लोक या संसर्गातून बरे झाले असून, मृत्युदर १.०९ टक्के आहे.

गेल्या २४ तासांत मृत्युमुखी पडलेल्या ४२०५ जणांपैकी ७९३ महाराष्ट्रातील, ४८० कर्नाटकातील, ३४७ दिल्लीतील, ३०१ उत्तर प्रदेशातील, २९८ तमिळनाडूतील, २१४ पंजाबमधील, १९९ छत्तीसगडमधील, १६९ राजस्थानमधील, १४४ हरियाणातील, १३२ पश्चिम बंगालमधील, गुजरात व उत्तराखंडमधील प्रत्येकी ११८, आंध्र प्रदेशातील १०८, तर झारखंडमधील १०३ जण आहेत.

आतापर्यंत मरण पावलेल्या २ लाख ५४ हजार १९७ जणांपैकी सर्वाधिक, म्हणजे ७७,१९१ महाराष्ट्रातील आहेत.