महाराष्ट्राने करोना आकडेवारीत दुरुस्ती केल्याने देशभरात गेल्या २४ तासांत ३९९८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४२ हजार १५ जणांना करोनाची लागण झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केले. देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी १२ लाख १६ हजार ३३७ जणांना करोनाची लागण झाली असून ४ लाख १८ हजार ४८० जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र सरकारने करोना आकडेवारीत दुरुस्ती केल्याने राज्यात ३,५०९ बळींची वाढ झाल्याचे उघड झाले आहे. राज्यात एकूण ३६५६ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे देशातील एकूण बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

करोनामुक्त होण्याची टक्केवारी ९७.३६ इतकी आहे. गेल्या २४ तासांत १८ लाख ५२ हजार ३३६ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ४४ कोटी ९१ लाख ९३ हजार २७३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ३ कोटी ३ लाख ९० हजार ६८७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

डेल्टा विषाणूबाबत सावध रहा – बायडेन

वॉशिंग्टन :अमेरिकेत करोना मृत्यूंच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असली तरी डेल्टा विषाणू देशात वेगाने पसरत असून त्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले. ते म्हणाले की, लसीकरणामुळे अमेरिकेत करोना मृत्यूंच्या संख्येत घट झाली आहे. लोकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे असल्याचे सांगून ते म्हणाले की, देशात जे करोना मृत्यू झाले आहेत किंवा ज्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे ते सर्व लस न घेतलेले लोक आहेत. अमेरिकेच्या काही भागांत डेल्टा विषाणूचा संसर्ग ८० टक्के असून त्यात मिसुरी, कन्सास व आयोवासारख्या राज्यांचा समावेश आहे. ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ या संस्थेने म्हटले आहे की, नवीन करोना संसर्ग हे डेल्टा विषाणूमुळे आहेत. एकूण अमेरिकेचा विचार केला तर ५१.७ टक्के संसर्ग हे डेल्टा विषाणूचे आहेत.

टोक्योत सर्वाधिक  रुग्णनोंद

टोक्यो : टोक्योतील ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यास फक्त दोन दिवस शिल्लक असतानाच या शहरात बुधवारी करोना संसर्गाची १८३२ प्रकरणे नोंदवली गेली. करोनाबाधितांची गेल्या सहा महिन्यांतील ही सर्वाधिक संख्या आहे. टोक्यो सध्या आणीबाणीच्या चौथ्या अवस्थेत असून, ही २२ ऑगस्टपर्यंत लागू आहे. ऑलिम्पिकच्या संपूर्ण कालावधीसाठी ती लागू असेल.