करोना विषाणू साथीच्या दुसऱ्या लाटेतून देश हळूहळू सावरत असून दैनंदिन रुग्णसंख्याही दिवसेंदिवस घटत आहे. शनिवारी गेल्या ४५ दिवसांतील सर्वांत कमी रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली.

गेल्या २४ तासांत देशात एक लाख ७३ हजार ७९० नवे रुग्ण आढळले. ४५ दिवसांतील हा नीचांक आहे. या नव्या रुग्णांमुळे देशातील आतापर्यंतची रुग्णसंख्या दोन कोटी ७७ लाख २९ हजार २४७ झाली आहे. रुग्णनिदानाचा दर दहा टक्क्यांच्या खाली म्हणजे ८.३६ टक्के आहे. तो गेले सलग पाच दिवस दहा टक्क्यांच्या  खाली आहे. साप्ताहिक रुग्णनिदान दर ९.८४ टक्के आहे. दिवसभरात ३६१७ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या तीन लाख २२ हजार ५१२ झाली आहे.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या २२ लाख २८ हजार ७२४ आहे. ती एक लाख १४ हजार ४२८ने कमी झाली आहे. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ८.०४ टक्के  आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९०.८० टक्के झाला आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ कोटी ५१ लाख ८८ हजार ११ असून मृत्यू दर १.१६ टक्के आहे.

आजाराकडे दुर्लक्ष नको : मुख्यमंत्री

मुंबई : पावसाळ्यातील काही आजारांची आणि करोनाची लक्षणे सारखी असतात. त्यामुळे ताप-सर्दी समजून लोकांनी दुर्लक्ष करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी के ले. डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमधील करोनाची लक्षणे वेळीच ओळखावीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.