देशात जवळपास दोन महिन्यांनंतर एका दिवसात करोनाची लागण होण्याच्या संख्येने नीचांक गाठला. गेल्या २४ तासांत एक लाख २० हजार ५२९ जणांना करोनाची लागण झाली त्यामुळे बाधितांची एकूण संख्या दोन कोटी ८६ लाख ९४ हजार ८७९ वर पोहोचली आहे, असे शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

गेल्या एका दिवसात करोनामुळे ३३८० जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या तीन लाख ४४ हजार ०८२ वर पोहोचली आहे. तर सलग पाचव्या दिवशी उपचाराधीन रुग्णांची संख्या २० लाखांहून कमी होती. शुक्रवारी एकूण २० लाख ८४ हजार ४२१ चाचण्या करण्यात आल्या.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १५ लाख ५५ हजार २४८ वर पोहोचली असून हे प्रमाण एकूण बाधितांच्या ५.७३ टक्के इतके आहे. करोनातून बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा झाली असून ते ९३.०८ टक्के इतके आहे. करोनातून आतापर्यंत दोन कोटी ६७ लाख ९५ हजार ५४९ जण बरे झाले आहेत तर मृत्युदर १.१९ टक्के इतका आहे.