देशात गेल्या एका दिवसात ९४ हजार ०५२ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या दोन कोटी ९१ लाख ८३ हजार १२१ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांत करोनामुळे ६१४८ जणांचा मृत्यू झाला असून हा एका दिवसातील उच्चांक आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या तील लाख ५९ हजार ६७६ इतकी झाली आहे, असे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली असून ती ११ लाख ६७ हजार ९५२ इतकी आहे, हे प्रमाण एकूण बाधितांच्या चार टक्के इतके आहे, तर करोनातून बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा झाली असून ते ९४.७७ टक्के इतके आहे. देशात आतापर्यंत दोन कोटी ७६ लाख ५५ हजार ४९३ जण करोनातून बरे झाले आहेत तर मृत्युदर १.२३ टक्के इतका आहे.

गेल्या २४ तासांत ६१४८ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी तीन हजार ९७१ जण बिहारमधील तर ६६१ जण महाराष्ट्रातील आहेत. देशात आतापर्यंत तीन लाख ५९ हजार ६७६ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी एक लाख एक हजार ८३३ जण महाराष्ट्रातील आहेत, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

झारखंडमध्ये लशी वाया जाण्याचे प्रमाण सर्वाधिक

झारखंड राज्यात कोविड-१९ लशीचा अपव्यय होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ३३.९५ टक्के इतके असल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये मे महिन्यात लशीची एकही मात्रा वाया गेली नाही आणि या राज्यांनी अनुक्रमे १.१० लाख आणि १.६१ लाख मात्रा जतन केल्या. छत्तीसगडमध्ये १५.७९ टक्के लशी वाया गेल्या तर मध्य प्रदेशमध्ये हे प्रमाण ७.३५ टक्के इतके आहे. तर पंजाब (७.०८ टक्के), दिल्ली (३.९५ टक्के), राजस्थान (३.९१ टक्के), उत्तर प्रदेश (३.७८ टक्के), गुजरात (३.६३ टक्के) आणि महाराष्ट्र (३.५९ टक्के) असे लशी वाया जाण्याचे प्रमाण आहे. मे महिन्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एकूण ७९०.६ लाख लशींचा पुरवठा करण्यात आला होता. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात लसीकरण कमी झाले.