देशात करोना रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली असून रुग्णसंख्या पुन्हा ३० हजारांवर गेली आहे. गेल्या २४ तासांत ३०,५७० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४३१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले आहे.

उपचाराधीन रुग्णांची संख्या ३ लाख ४२ हजार ९२३ झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या १.०३ टक्के इतकी नोंदली गेली आहे. गेल्या २४ तासांत सक्रिय रुग्णांची संख्या ८१६४ ने कमी झाली आहे.

देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी ३३ लाख ४७ हजार ३२५ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ४३ हजार ९२८ झाली आहे. तर मृत्यू दर १.३३ टक्के नोंदला गेला आहे. सर्वाधिक २०८ मृत्यू केरळमध्ये, ७६ गोव्यात तर ५६ महाराष्ट्रात झाले आहेत.

राज्यात ३५९५ नवे रुग्ण

राज्यात दिवसभरात ३,५९५ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले असून, ४५ जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या ४९,३४२ रुग्ण उपचाराधीन आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १३,५०७, ठाणे ७२२६, सातारा ४२५६ , नगर ६५७५ रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या २४ तासात नगर ५८९, पुणे जिल्हा ४९५, पुणे शहर २२७, सोलापूर २३२, सातारा २३६ नवे रुग्ण आढळले.

मुंबईत ४४६ रुग्णांचे निदान

गणेशोत्सवाच्या काळात घटलेल्या चाचण्यांमध्ये वाढ केल्याने मुंबईत दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याचे आढळले आहे. शहरात गुरुवारी ४४६ रुग्णांचे नव्याने निदान झाले आहे. गणपती उत्सवाच्या काळात शहरातील चाचण्यांची संख्या घटून प्रतिदिन ३० हजारांपर्यत खाली आली होती. अखेर बुधवारपासून त्यात वाढ करण्यात आली. बुधवारी ४४ हजार ६४९ चाचण्या केल्या गेल्या. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोधावरील भरही पालिकेचा वाढला असून गेल्या २४ तासांत ३०७२ व्यक्तींचा शोध घेतला गेला आहे.