२३३० जणांचा मृत्यू

देशात गेल्या एका दिवसात आणखी ६७ हजार २०८ जणांना करोनाची लागण झाल्याने करोनाबाधितांची एकूण संख्या दोन कोटी ९७ लाख ३१३ वर पोहोचली आहे. तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती आठ लाख २६ हजार ७४० वर आली आहे, असे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

गेल्या २४ तासात करोनामुळे २३३० जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या तीन लाख ८१ हजार ९०३ वर पोहोचली आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती आठ लाख २६ हजार ७४० वर आली असून हे प्रमाण एकूण बाधितांच्या २.७८ टक्के इतके आहे. तर करोनातून बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा झाली असून ते ९५.९३ टक्के इतके झाले आहे.

करोनामुळे गेल्या एका दिवसात २३३० जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी १२३६ जण महाराष्ट्रातील आहेत, तर आतापर्यंत तीन लाख ८१ हजार ९०३ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी एक लाख १५ हजार ३९० जण महाराष्ट्रातील आहेत.

दैनंदिन रुग्णसंख्येपेक्षा करोनातून बरे होण्याचे प्रमाण सलग ३५ व्या दिवशी जास्त आहे, आतापर्यंत दोन कोटी ८४ लाख ९१ हजार ६७० जण करोनातून बरे झाले असून मृत्युदर १.२९ टक्क्यांवर आला आहे, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

राज्ये, केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप २.१८ कोटींहून अधिक लस मात्रा

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे लशीच्या २.१८ कोटींहून अधिक मात्रा उपलब्ध असून आणखी ५६ लाख ७० हजार ३५० मात्रा पुढील तीन दिवसांमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना २७.२८ कोटींहून अधिक मात्रा विनामूल्य व थेट खरेदी वर्गवारीतून उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकी वाया गेलेल्या लशींसह २५ कोटी १० लाख तीन हजार ४१७ मात्रांचा वापर करण्यात आला आहे. सध्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे दोन कोटी १८ लाख २८ हजार ४८३ मात्रा उपलब्ध आहेत, असेही मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. आणखी ५६ लाख ७० हजार ३५० मात्रा उपलब्ध करून दिल्या जाणार असून त्या पुढील तीन दिवसांत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना मिळतील, असेही मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.