देशात करोना रुग्णसंख्येत किंचित घट झाली असून गेल्या २४ तासांत ४५,३५२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३६६ जणांचा मृत्यू झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ  झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले आहे.

उपचाराधीन रुग्णांची संख्या ३ लाख ९९ हजार ७७८ झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या १.२२ टक्के इतकी नोंदली गेली आहे. गेल्या २४ तासांत सक्रिय रुग्णांची संख्या १०१९५ ने वाढली आहे.

देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी २९ लाख ३ हजार २८९ जणांना करोनाची लागण झाली आहे, तर करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ३९ हजार ८९५ झाली आहे, तर मृत्युदर १.३४ टक्के नोंदला गेला आहे.  करोनामुक्त होण्याची टक्केवारी ९७.४८ इतकी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. आतापर्यंत ३ कोटी २० लाख ६३ हजार ६१६ जण करोनामुक्त झाले आहेत. गुरुवारी १६ लाख ६६ हजार ३३४ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण ५२ कोटी ६५ लाख ३५ हजार ६८ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

दैनंदिन रुग्णवाढीचा दर २.७२ टक्के नोंदला गेला आहे, तर साप्ताहिक रुग्णवाढीचा दर २.६६ टक्के इतका नोंदला आहे. गेल्या ७० दिवसांपासून रुग्णवाढीचा दर ३ टक्क्यांपेक्षा कमी नोंदला गेला आहे.

काही तासांतच दोन लसमात्रा…

मंगळुरु : कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात सुलिया तालुक्यात एका शाळेतील लसीकरण शिबिरात प्रचंड गर्दी झाली होती. त्या गडबडीत एका १९ वर्षाच्या रोजंदारी कामगाराला काही तासांच्या अवधीत दोन कोविड प्रतिबंधक लसमात्रा देण्यात आल्या. त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले  होते. तीन तासांनंतर त्याला घरी जाऊ देण्यात आले.  आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याला घरी पाठवले असले तरी बुधवारीही त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले. गुरुवारपर्यंत त्याच्यावर कुठलेही वाईट परिणाम दिसले नव्हते, असे सुलिया तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. बी. नंदकुमार यांनी सांगितले. कोटेलु तालुक्यातील के. बी. अरुण या रोजंदारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत ही घटना घडली.