नवी दिल्ली : देशातील बहुसंख्य भागांमध्ये करोनाची स्थिती सुधारत असली तरी ३८२ जिल्ह्यांमधील सकारात्मकता दर अद्यापही १० टक्क््यांहून अधिक असल्याने  आणखी दीर्घकाळ संघर्ष करावा लागणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

निर्बंध आणि प्रतिबंधित क्षेत्रे आणि विविध उपाययोजना करून भारताने करोनावर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात मजल मारली आहे, असे निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले.

देशाच्या बहुसंख्य भागांमध्ये करोनाची स्थिती सुधारत आहे, सकारात्मकता दर आणि उपचाराधीन रुग्णांमध्ये घट होत आहे तर बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, काही राज्यांमध्ये वाढही होत आहे हे संमिश्र चित्र आहे, त्यामुळे आपल्याला अद्यापही दीर्घकाळ संघर्ष करावा लागणार आहे. त्याचबरोबर आपण जी पावले उचलत आहोत त्यामध्ये हलगर्जीपणा होणार नाही याचीही खबरदारी घेतली पाहिजे, असेही पॉल म्हणाले. गेल्या २० दिवसांपासून उपचाराधीन रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याचे आढळले आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण १७.१३ टक्के इतके होते ते आता एकूण बाधितांच्या ११.१२ टक्के इतके आहे.