केंद्राचा दावा; मुलांच्या लसीकरणाचा निर्णय तातडीने नाही 

नवी दिल्ली : करोना विषाणू साथीची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे नमूद करीत ३७७ जिल्ह्यांमध्ये संसर्गदर ५ टक्क्यांपेक्षा खाली घसरल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने शुक्रवारी देण्यात आली. ७ मे रोजी दैनंदिन रुग्णसंख्येने शिखर गाठले होते, परंतु आता त्यांत ६८ टक्क्यांनी घट झाल्याचेही सांगण्यात आले. त्याचबरोबर लसीकरणात प्रौढांना प्राधान्य देण्यात येणार असून लहान मुलांबाबत तातडीने निर्णय होणार नसल्याचेही केंद्राने स्पष्ट केले.

शंभराहून अधिक दैनंदिन रुग्णवाढ होणाऱ्या जिल्ह्यांची  संख्या २९ एप्रिल ते ५ मे या आठवड्यात ५३८ होती,  ती आता २५७ पर्यंत खाली  आली आहे. त्या आठवड्यात संसर्गदर २१.६२ टक्के होता, तो आता ७.२७ टक्क्यांवर आला आहे. गेल्या २४ तासांत हा दर ६.४ टक्के होता, असे केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी शुक्रवारी सांगितले. शिवाय, देशातील ६६ टक्के नवी रुग्णसंख्या फक्त पाच राज्यांपुरती मर्यादित राहिली आहे. तसेच उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही १० मेपासून २१ लाखांहून अधिक घट झाली असून ३७७ जिल्ह्यांमधील संसर्गदर ५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्याचेही अगरवाल यांनी नमूद केले.

दोन महिन्यांनंतर करोना रुग्णांचा आलेख घसरत आहे. विशेषत: जेथे सध्या असलेल्या आरोग्य सुविधांच्या आधारे रुग्णांवर उपचार करणे शक्य आहे, अशा ठिकाणी हे चित्र आहे. बहुतेक राज्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे मृत्यूचा दरही कमी होत आहे. दहा दिवसांपूर्वी दररोज ४४०० रुग्ण दगावत होते. त्या तुलनेत सध्या दररोज तीन हजारांहून कमी मृत्यू होत आहेत.

मुलांच्या लसीकरणाचा निर्णय नंतर

ब्रिटनच्या वैद्यकीय नियमन यंत्रणेने १२-१५ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी ‘फायझर’ लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर, भारतातही मुलांच्या लसीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र, सध्या ४५ वर्षांहून अधिक वयोगटांतील व्यक्तींच्या लसीकरणाला केंद्राने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाचा निर्णय तातडीने घेतला जाणार नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) केलेल्या सीरो सर्वेक्षणामध्ये, प्रौढ व्यक्तींइतकाच लहान मुलांमध्येही करोनाचा संसर्ग झाल्याचे दिसले होते. २४ टक्के प्रौढांमध्ये तर, २२ टक्के लहान मुलांमध्ये प्रतिपिंडे आढळली होती. करोना विषाणूच्या दुहेरी उत्परिवर्तनामुळे दुसरी लाट अधिक घातक ठरली असून लहान मुलेही बाधित झाली आहेत. या पार्श्वभूमीवर, संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या स्तरावर दक्षता घेतली जात असून नियोजनही केले जात आहे. जूनच्या मध्यावर नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्यानेही लहान मुलांच्या लसीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, करोनाचा संसर्ग झालेल्या केवळ २-३ टक्के लहान मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागले असल्याचे निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व करोना कृतिगटाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.

देशातील १२-१८ वर्षे वयोगटातील मुलांची संख्या सुमारे १३-१४ कोटी असून त्यांच्या लसीकरणासाठी २६-२८ कोटी लसमात्रांची गरज भासेल. वेगवेगळ्या वयोगटांतील लसीकरणासाठी त्या गटातील लोकसंख्या विचारात घ्यावी लागते आणि तेवढ्या प्रमाणात लशींचा पुरवठा करावा लागतो. सध्या भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ तसेच, झायडस कंपनीच्या लशीचीही चाचणी घेतली जात असून त्या लहान मुलांसाठी सुरक्षित आहेत का, यासंदर्भात दोन-तीन आठवड्यांमध्ये अधिक माहिती हाती येईल. या लशींच्या चाचण्या यशस्वी झाल्यास लहान मुलांच्या लसीकरणाबाबत निर्णय घेता येऊ  शकेल, अशी माहिती पॉल यांनी दिली.

लस वाया जाण्याचे प्रमाण कमी करा- पंतप्रधान

नवी दिल्ली : देशात लसीकरण मोहिमेत लस वाया जाण्याचे प्रमाण सध्या अधिक असून ते कमी करण्यासाठी उपाय योजले पाहिजेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण आढावा बैठकीत स्पष्ट केले. १८ ते ४४ वर्षे तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची माहिती घेतानाच पंतप्रधानांनी आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचाही आढावा घेतला.  केंद्र सरकार लसउत्पादकांबरोबर क्रियाशीलपणे काम करीत आहे. त्यांना अधिकाधिक उत्पादनकेंद्रांसाठी आवश्यक त्या सुुविधा, कच्चा माल उपलब्ध करून देणे यासाठी मदत केली जात आहे, असे मोदी यांनी सांगितले.

‘देशात वेगाने लसीकरण’

देशातील प्रौढ लोकसंख्येला करोनाचा तीव्र संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याने ४५ पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण केले जाईल. तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करणे वा ती टाळण्यासाठी या वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण गरजेचे आहे. आत्तापर्यंत ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ४३ टक्के व्यक्तींचे तर, ४५च्या पुढील वयोगटातील ३७ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असून येत्या ३-४ आठवड्यांमध्ये ते ५० टक्क्यांपर्यत नेण्यात येईल, असे पॉल यांनी सांगितले. जगभरात पहिली लसमात्रा घेणाऱ्यांची सर्वाधिक म्हणजे १७.२ कोटी संख्या भारतात आहे. हे प्रमाण अमेरिकेत १६.९ कोटी, ब्रिटनमध्ये ३.९ कोटी आणि जर्मनीमध्ये २.८ कोटी आहे. ही आकडेवारी पाहता भारतात वेगाने लसीकरण होत असल्याचे पॉल म्हणाले.