आपत्कालीन वापराबाबतचा अर्ज फेटाळला

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने ‘भारत बायोटेक’च्या कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापराबाबतचा परवाना अर्ज नाकारल्याने या लशीला तेथे परवानगी मिळण्यास आता विलंब लागणार आहे.

अमेरिकेत कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास परवानगी मिळवण्यासाठी लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता या बाबत कंपनीला अधिक माहिती सादर करावी लागणार आहे.

‘भारत बायोटेक’ची सहकारी कंपनी ‘ऑक्युजेन इन्कॉर्पोरेशन’ने दाखल केलेला आपत्कालीन वापराबाबतचा अर्ज नाकारण्यात आला असून कंपनीला ‘बायोलॉजिक्स लायसन्स अ‍ॅप्लिकेशन’ म्हणजे ‘बीएलए’ मार्गाने अधिक माहिती उपलब्ध करण्यास सांगण्यात आले आहे.

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या सुचनेनुसार ‘बीएलए’ प्रकारचा अर्ज दाखल करण्यात येईल. ‘बीएलए’मुळे या लशीला मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर होतील. आता कंपनी आपत्कालीन वापरासाठी  अर्ज करणार नाही, असे ‘ऑक्युजेन इन्कॉर्पोरेशन’ने म्हटले आहे.

आपत्कालीन वापराचा अर्ज फेटाळला गेल्याने अमेरिकेत कोव्हॅक्सिन उपलब्ध होण्यास विलंब होणार आहे. ही लस उपलब्ध करण्याचा परवाना ऑक्युजेनला देण्यात आला आहे. ऑक्युजेनच्या माहितीनुसार आणखी काही चाचण्यांचे निष्कर्ष अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाला उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आपत्कालीन परवान्याच्या आम्ही जवळ पोहोचलो होतो, पण दुर्दैवाने ‘बीएलए’ची शिफारस करण्यात आल्याने आता पुढील प्रक्रिया थांबली आहे.

ऑक्युजेनचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शंकर मुसुनुरी यांनी सांगितले की, आम्ही कोव्हॅक्सिन ही लस अमेरिकत उपलब्ध करू यात शंका नाही. ही लस म्हणजे करोना विषाणू विरोधात भारताने वापरलेले मोठे शस्त्र आहे. ‘सार्स कोव्ह २’ या विषाणूच्या डेल्टासह सर्व प्रकारांचा मुकाबला ही लस यशस्वीपणे करू शकते. त्यामुळे अमेरिकी नागरिकांच्या रक्षणासाठी ही लस आवश्यक आहे.

 

‘ऑक्युजेन’चे म्हणणे…

आणखी काही चाचण्यांचे निष्कर्ष अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाला सादर करणे आवश्यक आहे. आता आपत्कालीन परवान्यासाठी अर्ज केला जाणार नाही. आम्ही याबाबतची बरीच माहिती सादर केली होती. आता बीएलए प्रकारच्या अर्जात अधिक माहिती पुरवण्यात येईल, असे ‘ऑक्युजेन’ने स्पष्ट केले.

नकार का?

’‘ऑक्युजेन इन्कॉर्पोरेशन’ने आपत्कालीन परवान्यासाठी केलेल्या अर्जात दिलेली माहिती अपुरी आहे. कंपनीला ‘बीएलए’ प्रकारचा अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.

’त्यानुसार आता मानवी चाचण्यांसाठी ही लस सुरक्षित असल्याचे सिद्ध करणारी आणि तिची परिणामकारकता सिद्ध करणारी आणखी काही माहिती भारत बायोटेकला सादर करावी लागणार आहे.