खासगी रुग्णालयांमध्ये २५० रुपये; लसीकरणाचा तिसरा टप्पा उद्यापासून

खासगी रुग्णालयांतूनही करोना लस देण्यात येणार असून तिच्या प्रत्येक मात्रेसाठी २५० रुपये शुल्क आकारले जाईल, तर सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत देण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य विभागाने शनिवारी सांगितले. लसीकरणाचा तिसरा टप्पा सोमवारपासून (१ मार्च) सुरू होत आहे. या टप्प्यात वृद्ध आणि सहआजारांच्या रुग्णांचे लसीकरण करण्यात येईल. ४५ ते ५९ वयोगटातील हृदयविकार, पक्षाघात, दहा वर्षांपासून मधुमेह असलेले, उच्चरक्तदाबाचे रुग्ण, डायलीसीसवरील रुग्ण, कर्करुग्ण आदी २० प्रकारच्या रुग्णांचे लसीकरण करण्यात येईल.

आरोग्य कर्मचारी, आघाडीचे कर्मचारी असे लसीकरणाचे पहिले दोन टप्पे झाल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यात सोमवारपासून वृद्ध तसेच सहआजाराच्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे. सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रात लस मोफत दिली जाणार आहे, तर खासगी रुग्णालयांमध्ये लस सशुल्क असेल, असे केंद्रीय आरोग्य राजेश भूषण यांनी राज्यांच्या आरोग्य सचिवांच्या दूरसंवाद बैठकीत स्पष्ट केले होते.

खासगी रुग्णालयांत प्रत्येक लसमात्रेसाठी २५० रुपये आकारले जातील. करोना प्रतिबंधासाठी लशीच्या दोन मात्रा आवश्यक असून त्यासाठी ५०० रुपये शुल्क द्यावे लागेल. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने हा निर्णय घेतला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्येक मात्रेसाठी जे २५० रुपये आकारले जाणार आहेत, त्यात १५० रुपये लशीचे आणि १०० रुपये सेवा सुल्क आहे. लसीकरणासाठी निवडलेल्या खासगी रुग्णालयांची यादी केंद्रीय आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

सरकारने आतापर्यंत खासगी रुग्णालयांतून दिल्या जाणाऱ्या लशीची किंमत निश्चित केली नव्हती. आता ती केली असली तरी पुढील सूचना मिळेपर्यंत लशीची किंमत बदलू शकते, असे सांगण्यात आले. खासगी संस्थांना सरकारी रुग्णालयातूनच लसपुरवठा केला जाणार आहे. सरकारने सरकारी रुग्णालयांतून लस मोफत देण्याचे ठरवले आहे.

आरोग्य कर्मचारी आणि आघाडीचे कर्मचारी यांचे लसीकरण झाल्यानंतर आता सोमवारपासून तिसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्यात ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती आणि ४५ वर्षांहून अधिक वयाच्या सहआजार रुग्णांना लस दिली जाईल. एकूण १० हजार सरकारी सुविधा व २० हजार खासगी रुग्णालये त्यासाठी सज्ज करण्यात आली आहेत.

‘कोविन अ‍ॅप २.०’ची मदत 

– नावनोंदणी करण्यासाठी ‘कोविन’ अ‍ॅपच्या नव्या आवृत्तीत ‘जीपीएस’ची सुविधा.

– ‘कोविन अ‍ॅप’च्या मदतीने नावनोंदणी, लसीकरणाची वेळ निश्चित करता येईल.

– मोबाइल नंबर नोंदवल्यानंतर त्या व्यक्तीच्या खात्याचा ‘ओटीपी’ तयार होईल.

– त्याच खात्यावर कुटुंबातील इतरांची नोंदणी करता येईल.

– परराज्यातून आलेल्या व्यक्तींना ती सध्या ज्या राज्यात आहे त्या राज्यात लस घ्यावी लागेल.

– जे थेट नावनोंदणीसाठी लसीकरण केंद्रात येतील त्यांना स्वयंसेवक मदत करतील.

सहआजारांचे रुग्ण

लसीकरणासाठी ४५ वर्षांवरील व्यक्तींना त्यांची सहआजाराची वैद्यकीय प्रमाणपत्रे अपलोड करावी लागतील. हृदयविकार, पक्षाघात, दहा वर्षांपासून मधुमेह असलेले, उच्चरक्तदाबाचे रुग्ण, डायलीसीसवरील रुग्ण, कर्करुग्ण आदी २० प्रकारच्या रुग्णांना लस देण्यात येईल.

धारावीत तपासणी, चाचणीसत्र सुरू

दाटीवाटी असलेल्या धारावीमध्ये करोना रुग्ण वाढत असल्याने मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा धारावीतील घराघरात जाऊन तपासणी सुरू केली आहे. त्याचबरोबर गर्दीची ठिकाणे आणि धार्मिकस्थळी येणाऱ्या नागरिकांची तपासणी आणि गरजेनुसार चाचणीही करण्यात येत आहे.

मुंबईत ९८७ जणांना संसर्ग

मुंबईत शनिवारी ९८७ जणांना करोनाचा संसर्ग झाला तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. गेले दोन-तीन दिवस एक हजारांहून अधिक रुग्ण आढळत होते. मात्र शनिवारी तुलनेने कमी रुग्णांचे निदान झाले. शहरातील एकूण रुग्णसंख्या आता तीन लाख २४ हजार ८६४वर पोहोचली आहे.

राज्यात ८,६२३ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ८,६२३ नवे रुग्ण आढळले. नागपूर, पुणे, अमरावती, नाशिक या शहरांमध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे.

दिवसभरात नागपूर शहर ८३८, अमरावती ४२३, पुणे शहर ७४३, पिंपरी-चिंचवड ३४०, उर्वरित पुणे जिल्हा ४०१, नाशिक शहर ५५०

जळगाव ३८१, औरंगाबाद शहर २४२, जालना १०२, नगर २६९, सातारा १८० आणि  अकोल्यात २८७ नवे रुग्ण आढळले.

राज्यात ७२,५३० रुग्ण उपचाराधीन असून त्यात सर्वाधिक १३,६९२ रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत.

देशात १६,४८८ बाधित

देशात शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी एका दिवसात १६ हजार ४८८ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याने बाधितांची एकूण संख्या एक कोटी, १० लाख, ७९ हजार, ९७९ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ११३ रुग्णांचा मृत्यू झाला.

लसनिवडीची मुभा नाही

लसनिवडीची (कोव्हिशिल्ड की कोव्हॅक्सिन) मुभा लाभार्थीना नसेल. परंतु त्यांना सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्र निवडण्याची मुभा असेल.