वेगाने फैलाव, १३२ देशांमध्ये प्रादुर्भाव; लस घेतलेल्या व्यक्तींनाही संसर्ग

मूळ करोना विषाणूपेक्षा घातक आणि अधिक वेगाने प्रादुर्भाव होणाऱ्या ‘डेल्टा’चा अमेरिका, चीनसह १३२ देशांमध्ये फैलाव झाला आहे. सर्वाधिक संसर्गजन्य असलेल्या डेल्टा विषाणूमुळे करोनाविरोधातील लढ्याचे स्वरूप बदलले आहे, असे अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल’ने (सीडीसी) स्पष्ट केले आहे.

‘डेल्टा’मुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या अनुषंगाने स्पष्ट संदेश प्रसारित करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीकरणाची सक्ती आणि मुखपट्टीचा वापर या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब पुन्हा एकदा करण्याची आवश्यकता ‘सीडीसी’ने अधोरेखित केली आहे.

करोना विषाणूचा डेल्टा हा उत्परिवर्तित प्रकार प्रथम भारतात आढळला आणि आता त्याचा फैलाव जगभरात झाल्याचे ‘सीडीसी’च्या अंतर्गत अहवालामध्ये म्हटले आहे. हा विषाणू कांजण्यांच्या विषाणूप्रमाणे वेगाने पसरतो. तसेच सर्दीच्या विषाणूपेक्षाही त्याचा प्रादुर्भाव वेगाने होतो, असेही ‘सीडीसी’ने नमूद केले आहे.

‘इम्प्रुव्हिंग कम्युनिकेशन्स अराऊंड व्हॅक्सिन ब्रेकथ्रू अँड व्हॅक्सिन इफेक्टिव्हनेस’ या अहवालात ‘डेल्टा’च्या धोक्याबद्दल इशारा देण्यात आला आहे. डेल्टाचा सामना करण्यासाठी नव्या योजना आखाव्या लागणार आहेत. त्याचा धोका लोकांना समजून सांगावा लागणार आहे. लसीकरण न झालेल्या व्यक्तींना त्याचा संसर्ग होण्याचे प्रमाण लस घेतलेल्यांपेक्षा दहापट अधिक असू शकते. त्यामुळे प्रसंगी मृत्यू ओढवू शकतो. हे लक्षात घेता करोनाविरोधातील लढ्याचे स्वरूप आता बदलावे लागेल, असेही या अहवालात नमूद केले आहे.

लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही डेल्टाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याने प्रतिबंधात्मक उपाय वाढवण्याची, ते आणखी कठोर करण्याची आवश्यकताही अहवालात अधोरेखित केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण सक्तीचे करण्याबरोबरच सर्वांनी मुखपट्टी वापरण्यास सुरुवात करावी, असेही सुचवण्यात आले आहे. ‘दी वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये याबाबत ज्या बातम्या या अहवालाच्या आधारे प्रसिद्ध झाल्या, त्यांना दुजोरा देण्यात आला आहे.

लसीकरण झालेल्या व्यक्तींना डेल्टाचा धोका तुलनेने कमी आहे. करोनाच्या अन्य प्रकारांपेक्षा डेल्टाच्या संसर्गाचा वेग जास्त आहे. लसीकरण झालेल्या व्यक्तींमार्फतही हा विषाणू पसरू शकतो. म्हणजे लसीकरण झालेल्या व्यक्ती डेल्टाच्या वाहक असू शकतात, असे ‘सीडीसी’च्या संचालक रॉशेली वॅलेन्स्की यांनी म्हटले आहे. या अहवालाच्या आधारे सीडीसी या रोग नियंत्रण संस्थेने काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून लसीकरण झालेल्या व्यक्तींनीही मुखपट्टी वापरावी, असे सुचवले आहे. लस घेतलेल्या एकूण ६५८७ जणांना डेल्टाचा संसर्ग झाल्याचे २६ जुलैअखेर निष्पन्न झाले आहे. याचा अर्थ अमेरिकेत दर आठवड्याला ३५००० लोक संक्रमित होत आहेत.

डेल्टा विषाणू घातक असून त्यामुळे मृत्युदर आणि रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण वाढत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस घेब्रेसस यांनी म्हटले आहे, तर लशीही गंभीर आजार रोखण्यात फारशा प्रभावी ठरताना दिसत नाहीत, अशी चिंता जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन तज्ज्ञ माईक रायन यांनी व्यक्त केली आहे.

आतापर्यंत काही लशींना मंजुरी देण्यात आली आहे. त्यांना ऑगस्टमध्ये पूर्ण मंजुरी दिली जाईल आणि लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले जाईल, असे अमेरिकेचे साथरोगतज्ज्ञ अँथनी फाउची यांनी सांगितले.

ब्रिटनमध्ये डेल्टा विषाणूचे प्रमाण वाढत असून तेथे लसीकरण वेगाने करण्यात येऊनही लशीचा परिणाम टिकेनासा झाला आहे. ‘सीडीसी’ने लसीकरणानंतर मुखपट्टी वापरण्याची गरज नाही, असे सांगितले होते; पण आता पुन्हा मुखपट्टी वापरण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी स्थानिक प्रशासनाला नियमित चाचण्या व लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर प्रवासावरही निर्बंध घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.

‘डेल्टा’चा धोका लक्षात घेऊन आशियातील देशांनीही शुक्रवारी नवे निर्बंध जारी केले आहेत. ऑस्ट्रेलियात लष्कराच्या मदतीने बाधितांना विलगीकरणात पाठवले जात आहे. फिलिपाइन्सची राजधानी मनिला येथे एक कोटी ३० लाख नागरिकांना दोन आठवडे टाळेबंदीत राहावे लागणार आहे.

 

करोनाबाधित बालकांची संख्या

आत्तापर्यंत ० ते १० वयोगटातील सुमारे दोन लाख बालके बाधित झाली आहेत. ११ ते २० वयोगटातील चार लाख ६३ हजार ९४ मुले बाधित झाली आहेत. एकूण बाधितांपैकी ३.१२ टक्के ० ते १० वयोगटातील, तर ७.२० टक्के ११ ते २० वयोगटातील आहेत. ० ते १० वयोगटातील एकूण बालकांपैकी आत्तापर्यंत सुमारे १९ टक्के, तर ११ ते २० वयोगटातीलही सुमारे १९ टक्के मुले बाधित झाली आहेत. ऑक्टोबर २०२०च्या आकडेवारीनुसार, राज्यात ० ते १० वयोगटातील ५९ हजार ८५७, तर ११ ते २० वयोगटातील १,१२,३४५ बालके बाधित झाली होती.

अतिधोकादायक…

लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही डेल्टा संसर्गाचा धोका.

डेल्टाच्या संसर्गामुळे आधीच्या करोना विषाणूपेक्षा गंभीर लक्षणे.

डेल्टा प्रथम भारतात आढळला आणि आता जगभरात पसरला.

सर्दी आणि कांजण्यांच्या विषाणूपेक्षा डेल्टाचा अधिक वेगाने फैलाव.

अमेरिकेत दर आठवड्याला ३५००० लोक संक्रमित.

सर्वांत आधी लसीकरण झालेल्या श्रीमंत देशांतही आता डेल्टाचा प्रादुर्भाव.

नव्या आदेशांची प्रतीक्षाच

मुंबई  :  ऑगस्टमध्ये निर्बंध आणखी शिथिल के ले जाणार, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर करूनही मुख्यमंत्र्यांकडील सामान्य प्रशासन विभागाने शनिवारी रात्री उशिरापर्यंत नवे आदेश लागू के ले नव्हते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत १ तारखेपासून दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढविल्या जातील, मॉल्स व चित्रपटगृहे ५० टक्के  क्षमतेने सुरू होतील, आठवड्यातील सहा दिवस व्यवहार सुरू राहतील अशा पद्धतीने निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी जाहीर के ले होते. परंतु मुख्यमंत्री ठाकरे निर्बंध जास्त शिथिल करण्याच्या विरोधात असल्याचे समजते. आदेश न निघाल्याने बहुतांश महानगरपालिकांनी आपापल्या हद्दीत आधीचेच निर्बंध कायम राहतील, असे आदेश शनिवारी दिले.

कल्याण-डोंबिवलीत १० दिवसांत ५३ मुले बाधित  

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांत गेल्या दहा दिवसांत ५३ मुलांना करोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या बाधित मुलांना सौम्य लक्षणे आहेत. मात्र यावरून मुलांना करोना संसर्ग होण्याची लाट आली, असा निष्कर्ष काढता येणार नाही, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यात डेल्टा प्लसचे २३ रुग्ण : राज्यात आत्तापर्यंत डेल्टा प्लसचे २३ रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरीत नऊ, जळगावमध्ये सात, मुंबईत चार आणि पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. बहुतांश रुग्ण सौम्य लक्षणांचे होते.

रत्नागिरीत पहिला मृत्यू :  रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूने बाधित एका ८० वर्षीय महिलेचा नुकताच मृत्यू झाला. डेल्टा प्लसमुळे झालेला राज्यातील हा पहिलाच मृत्यू आहे.