विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी

 

पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ आणि आसाम ही चार राज्ये तसेच पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी होत आहे. सर्वाधिक चुरस पश्चिम बंगालमध्ये आहे. ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस सत्ता राखणार की भाजपला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. सर्व ठिकाणी करोनाप्रतिबंधक उपाययोजना करून मतमोजणी केली जाणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये २९४ जागांसाठी आठ टप्प्यांत चुरशीने मतदान झाले. सत्तारूढ तृणमूल काँग्रेस विरोधात भाजप अशी कडवी झुंज येथे पाहायला मिळाली. बहुसंख्य मतदानोत्तर चाचण्यांमध्ये तृणमूल काँग्रेसला पुन्हा सत्तेची संधी असल्याचे भाकीत वर्तवण्यात आले. अर्थात, काही मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजप सत्तेत येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे बंगालचा कौल काय लागणार याची उत्सुकता आहे. बंगालमध्ये बहुमतासाठी १४७ जागांची गरज आहे. राज्यात जर त्रिशंकू स्थिती निर्माण झाली तर काँग्रेस तसेच डाव्या पक्षांच्या आघाडीला मिळणाऱ्या जागा निर्णायक ठरतील. पश्चिम बंगालमध्ये १०८ मतदान केंद्रांवर मतमोजणी होईल. मतदान केंद्रांमध्ये प्रवेशासाठी उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींना करोना चाचणी अहवाल किंवा लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. देशभर करोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणूक आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत त्याचे काटेकोर पालन केले जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

विजयन यांचा करिश्मा?

ल्ल केरळमध्ये दर वर्षांनी सत्ता बदल होतो, मात्र यंदा मुख्यमंत्री विजयन यांच्या नेतृत्वात डाव्या आघाडीला पुन्हा संधी मिळेल असा जनमत चाचण्यांचा कौल आहे. राज्यात १४० जागा असून, ११४ मतदान केंद्रे आहेत. येथे डाव्या आघाडीपुढे काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीचे आव्हान आहे. विजयन यांच्या प्रतिमेमुळे राज्यात सत्ताबदलाची शक्यता कमी असल्याचा जनमत चाचण्यांचा अंदाज आहे.

ल्ल भाजपच्या दृष्टीने आसाममध्ये सत्तेची सर्वाधिक संधी आहे. राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. काँग्रेसप्रणीत आघाडीने आव्हान उभे केले असले तरी ध्रुवीकरणामुळे भाजपला काँग्रेस आघाडीपेक्षा जास्त जागा मिळतील असा मतदानोत्तर चाचण्यांचा कौल आहे. राज्यात १२६ जागा आहेत. मतदानोत्तर चाचण्यांचे कौल अलीकडेच बिहारमध्ये चुकले होते. त्यामुळे मतदारांनी नेमका काय कौल दिला आहे, ते आज स्पष्ट होणार आहे.

तमिळनाडूत सत्ताबदल?

तमिळनाडूत सत्तारूढ अण्णाद्रमुक विरोधात द्रमुक अशी पारंपरिक लढत आहे. राज्यात २३४ जागांसाठी चार हजार उमेदवार रिंगणात आहेत. बहुतेक सर्वच मतदानोत्तर चाचण्यांमध्ये द्रमुकला मोठे यश मिळेल असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. सध्या अण्णाद्रमुक सत्तेत आहे. तमिळनाडूत ७५ मतमोजणी केंद्रे आहेत. १३ ते ४३ मतमोजणीच्या फेऱ्या होतील. पुदुच्चेरीतही काँग्रेस-द्रमुकची सत्ता जाऊन माजी मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखाली एनआर काँग्रेस-भाजप आघाडी सत्तेत येईल असा जनमत चाचण्यांचा कल आहे. पुदुच्चेरीत तीस जागा आहेत.