भारतातील करोना रुग्णांची संख्या शनिवारी ३ लाख ९२ हजार ४८८ होती. ही संख्या आधीच्या दिवसापेक्षा महिनभरात प्रथमच कमी नोंदली गेली आहे. शुक्रवारी करोना रुग्णांची संख्या ४ लाख १ हजार ९९३ होती.  रुग्णांच्या संख्येत ९५०० घट झाली आहे.

एप्रिल महिन्यात करोना रुग्णांची संख्या रोज सोमवार वगळता वाढत होती.  एप्रिलच्या सुरुवातीला भारतात एका दिवसात करोना रुग्णांची संख्या दैनंदिन काळात १ लाख होती तर ती अलीकडे ४ लाखावर गेली आहे. महिनाभरातील हा कल सोमवार वगळता शनिवारी वेगळा दिसला. सध्या तरी हा आकड्यांचा खेळ वाटत असला तरी लवकरच करोनाची लाट शिखरावस्थेवरून घसरण्याची चिन्हे दिसत आहेत. सोमवारी दिलेल्या आकडेवारीत चाचण्या कमी असल्याने संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या कमी असते पण हा आकडा शनिवारचा असल्याने त्याबाबत अशी कुठलीही कारणे असण्याची शक्यता नाही.

शनिवारी १८ लाख नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आधीचे दोन दिवस १९ लाख नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती. पण इतर दिवसांपेक्षा १८ लाख नमुन्यांची तपासणी हा जास्त आकडा होता. महाराष्ट्रात शिखरावस्था संपून करोनाचा आलेख सपाट होण्याकडे वाटचाल आहे. रुग्णसंख्येतील घट ही स्पष्टपणे दिसत आहे. उपचाराधीन रुग्णांतही घट होत असून हा कल दहा दिवस कायम आहे. २२ एप्रिलला ७ लाख रुग्ण होते तो आकडा आता ६.६३ लाखांपर्यंत आला आहे म्हणजे रुग्णसंख्या घटली आहे. गेले वीस दिवस दैनंदिन रुग्ण संख्या ही साठ हजारावर होती. पण आता ही संख्या कमी होत आहे. एप्रिलमध्ये सोमवार वगळता प्रत्येक दिवशी करोना रुग्णसंख्या अधिक होती. पण शनिवारी पहिल्यांदा  सोमवार वगळता रुग्ण संख्या प्रथमच कमी झाली. दिल्लीतही असाच कल दिसत असून उपचाराधीन रुग्ण एक लाखाच्या खाली आहे. गेल्या दहा दिवसांत रोज १० हजार रुग्णांची तेथे भर पडली. या रुग्णांपैकी कुणी या काळात बरे झाले असल्याची शक्यता कमी आहे. दैनंदिन रुग्णांची संख्येत वाढ झाली नाही यात आशेचा किरण दिसत आहे. महाराष्ट्र व दिल्लीत पुढील काही दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता आहे. इतर कुठल्याही राज्यात महाराष्ट्राइतकी स्थिती खालावली नव्हती. महाराष्ट्रात आता रुग्ण संख्या कमी झाली तरी इतर राज्यांत ती वाढू शकते.  कर्नाटकात शुक्रवारी दैनंदिन रुग्णसंख्या ४८ हजार  तर शनिवारी ती ४१ हजार राहिली.

उत्तर प्रदेशात करोनाची रुग्णसंख्या वाढण्याची चिन्हे असताना तिथेही दहा दिवसात आलेख स्थिरावला आहे. केरळात रोज ३० हजार रुग्ण सापडत होते तेथेही आता करोनाचा आलेख सपाट होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

उपचाराधीन रुग्णांचा विचार केला तर २० दिवसांत या शनिवारी त्यांची संख्या फार कमी वाढली आहे. सोमवार वगळले तर हीच संख्या दिसून येते. १३ ते २८ एप्रिल दरम्यान उपचाराधीन रुग्णांची संख्या दिवसाला लाखाने वाढत होती. एप्रिलमध्ये ती पाच पटींनी वाढली, सहा लाखांवरून  ती आता ३३ लाख आहे. गेल्या तीन दिवसांत उपचाराधीन रुग्णांची संख्या  लाखापेक्षा कमी वाढली असून शनिवारी ती ८१ हजाराने वाढली होती. हा अनपेक्षित कल म्हणता येणार नाही. बरे झालेले रुग्ण, मृत्यू या दोन्ही बाबतीत शनिवारी घट झाली आहे. याशिवाय शनिवारी उपचाराधीन रुग्ण प्रथमच चाळीस लाखांच्या खाली गेले आहेत.

 

१८ ते ४४ वयोगटातील ८६ हजार जणांचे लसीकरण

नवी दिल्ली : भारतात १ मे रोजी  १८-४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले असून त्यात ८६०२३ जणांना लस देण्यात आली आहे. एकूण ११ राज्यात १ मे रोजी लसीकरण झाल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत देशात सर्व वयोगटातील मिळून १५.६८ कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. या गटातील लसीकरणास शनिवारपासून सुरूवात झाली पण काही ठिकाणी लसीकरण झाले तर काही ठिकाणी झाले नाही. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार  एकूण ११ राज्यांत हे लसीकरण झाले.

छत्तीसगड ९८७, दिल्ली १४७२, गुजरात ५१६२२, जम्मू व काश्मीर २०१, कर्नाटक ६४९, महाराष्ट्र १२५२५, ओडिशा ९७, पंजाब २९८, राजस्थान १८५३, तमिळनाडू ५२७, उत्तर प्रदेश १५७९२ या प्रमाणे लसीकरण झाले आहे.

एकूण १५ कोटी ६८ लाख १६ हजार ३१ लोकांचे लसीकरण २२ लाख ९३ हजार ९११ सत्रात करण्यात आले आहे. ९४ लाख २८हजार ४९० आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली, तर ६२ लाख ६५ हजार ३९७ कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. १ कोटी २७ लाख ५७ हजार ५२९ आघाडीच्या कर्मचाऱ्यांना पहिली, तर ६९ लाख २२ हजार ९३ आघाडीच्या कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. ६० पेक्षा अधिक वयोगटातील १ कोटी १४ लाख ४९ हजार ३१० जणांना पहिली, तर ५ कोटी ३२ लाख ८० हजार ९७६ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहेत. ४५ ते ६० वयोगटात ५ कोटी ३२ लाख ८० हजार ९७६ जणांना पहिली, तर ४० लाख ८ हजार ७८ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिाम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, बिहार, आंध्र प्रदेश या राज्यात एकूण लसीकरणापैकी ६७ टक्के लसीकरण झाले असून गेल्या २४ तासात १८ लाख जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.