२४ तासांत ३.२९ लाख जणांना लागण

देशात १४ दिवसांनंतर प्रथमच करोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासात देशात तीन लाख २९ हजार ९४२ जणांना करोनाची लागण झाली असून बाधितांची एकूण संख्या दोन कोटी २९ लाख ९२ हजार ५१७ वर पोहोचली आहे, असे मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

देशात गेल्या एका दिवसात करोनामुळे आणखी ३८७६ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या दोन लाख ४९ हजार ९९२ वर पोहोचली आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ३७ लाख १५ हजार २२१ वर पोहोचली असून हे प्रमाण एकूण बाधितांच्या १६.१६ टक्के इतके आहे. आतापर्यंत एक कोटी ९० लाख २७ हजार ३०४ जण करोनातून बरे झाले आहेत त्यामुळे बरे होण्याचे प्रमाण ८२.७५ टक्के इतके आहे. तर मृत्युदर १.०९ टक्के इतका आहे. गेल्या एका दिवसात करोनामुळे ३८७६ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी ५४९ जण महाराष्ट्रातील आहेत तर आतापर्यंत एकूण दोन लाख ४९ हजार ९९२ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी ७६ हजार ३९८ जण महाराष्ट्रातील आहेत, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.