देशातील करोना रुग्णसंख्येत गेल्या तीन दिवसांपासून वाढ होत असून रुग्णसंख्या  ३४ हजारांवर गेली आहे. गेल्या २४ तासांत ३४,४०३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३२० जणांचा मृत्यू झाला आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मात्र घट होत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले आहे.

उपचाराधीन रुग्णांची संख्या ३ लाख ३९ हजार ०५६ झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या १.०३ टक्के इतकी नोंदली गेली आहे. गेल्या २४ तासांत सक्रिय रुग्णांची संख्या ३८६७ने कमी झाली आहे.

देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी ३३ लाख ८१ हजार ७२८ जणांना करोनाची लागण झाली, तर  बळींची एकूण संख्या ४ लाख ४४ हजार २४८ झाली आहे. तर मृत्यू दर १.३३ टक्के नोंदला गेला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

कंबोडियात बालकांच्या लसीकरणास प्रारंभ फुनॉम पेन : कंबोडिया सरकारने ६ ते ११ वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यास शुक्रवारपासून प्रारंभ केला आहे. पंतप्रधान हून सेन यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे तेथे महिनाभरापासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. ‘मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मुले जेव्हा शाळेत परततील तेव्हा ते आणि त्यांचे शिक्षण करोनापासून सुरक्षित असेल’, असे हून सेन यांनी म्हटले आहे. ११ वर्षांवरील मुलांना कंबोडियामध्ये यापूर्वीच लस देण्यात आली असून आता ३ ते ५ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना अभ्यास करण्यास सेन सांगितले आहे. आतापर्यंत जवळपास ७२ टक्के म्हणजेच एक कोटी ७० लाख नागरिकांनी किमान एक लसमात्रा घेतली आहे. तेथे आतापर्यंत एक लाख दोन हजार ८३४ जणांना करोनाची लागण झाली असून २०८९ जणांचा मृत्यू झाला आहे.

श्रीलंकेत १ ऑक्टोबरपर्यंत कठोर निर्बंध

श्रीलंकेत सातत्याने वाढत असलेल्या करोना रुग्णसंख्येमुळे आणि तिसऱ्या लाटेचा प्रभावी सामना करण्यासाठी स्थानिक डॉक्टरांच्या वाढत्या दबावामुळे १ ऑक्टोबरपर्यंत टाळेबंदी वाढविण्याचा निर्णय श्रीलंकेच्या सरकारने शुक्रवारी घेतला.

राष्ट्राध्यक्ष गोताबाय राजपक्षे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी अध्यक्षांनी २० ऑगस्टला १० दिवसांची टाळेबंदी जाहीर केली होती. त्यानंतर त्याला २१ स्पटेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. २१ सप्टेंबरला टाळेबंदी उठवण्यात येणार होती. मात्र, टाळेबंदीतील निर्बंधांचे कठोर पालन न केल्याने अद्याप देश करोनाच्या धोक्यापासून मुक्त झालेला नाही, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितल्याने राष्ट्राध्यक्ष गोताबाय राजपक्षे यांनी १ ऑक्टोबरपर्यंत टाळेबंदी वाढविण्याचा निर्णय घेतला. सध्या दररोज तेथे २३०० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. तर आतापर्यंत तेथे ११ हजार ८१७ जणांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णसंख्या ४ लाख ९८ हजार ६९४ इतकी झाली आहे.