दिल्ली बाजारपेठेतील गर्दीबाबत उच्च न्यायालयाला चिंता

कोविड-१९ निर्बंध झुगारून राजधानी दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये झालेल्या तोबा गर्दीची शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दखल घेतली. अशा प्रकारे निर्बंधांचे उल्लंघन झाल्यास करोनाची तिसरी लाट लवकरच येईल आणि काहीही झाले तरी तसे होऊ देता काम नये, असे न्यायालयाने म्हटले आहे.

कोविड-१९ बाबतचे निर्बंध अशा प्रकारे झुगारण्याचे प्रकार सुरू राहिले तर त्याचा आपल्याला खूप त्रास होईल आणि असे घडले तर परमेश्वारच आपल्याला मदत करो, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. केंद्र आणि दिल्ली सरकारने या प्रकारांना आळा घालण्यासाठी दुकानदार, बाजारपेठा आणि विक्रेते यांच्या संघटनांची बैठक घ्यावी, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे.

एम्समधील एका डॉक्टरने उच्च न्यायालयातील एका न्यायमूर्तींच्या व्हॉट्सअ‍ॅपवर बाजारपेठेत विक्रेत्यांनी कशा प्रकारे करोना निर्बंधांचे उल्लंघन केले आहे त्याची छायाचित्रे पाठविली त्याची न्या. नवीन चावला आणि न्या. आशा मेनन यांच्या सुटीकालीन पीठाने दखल घेतली.

करोनाच्या दुसऱ्या लाटेची आपण मोठी किंमत मोजली आहे, दुसऱ्या लाटेचा तडाखा बसला नाही असे एक तरी कुटुंब आहे का, याची आम्हाला कल्पना नाही, अशा प्रकारची छायाचित्रे आपण पाहतो तेव्हा या शहरातील नागरिक म्हणून आपल्याला काळजी वाटते, असे पीठाने म्हटले आहे. दुसऱ्या लाटेचा तडाखा बसला त्याच्या स्मृती अद्यापही ताज्या आहेत, अनेकांचे वैयक्तिक नुकसान झाले आहे, असेही पीठाने म्हटले आहे.

छायाचित्रांची स्वत:हून दखल घेत पीठाने याबाबतच्या  जनहित याचिकेवर केंद्र, दिल्ली सरकार आणि दिल्ली पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

 

देशात २४ तासांत ६२,४८० बाधित

देशात गेल्या एका दिवसात आणखी ६२ हजार ४८० जणांना करोनाची लागण झाल्याने बधितांची एकूण संख्या दोन कोटी ९७ लाख ६२ हजार ७९३ वर पोहोचली आहे, तर एका दिवसात आणखी १५८७ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या तीन लाख ८३ हजार ४९० वर पोहोचली आहे, असे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. ७३ दिवसांच्या कालावधीनंतर  उपचाराधीन रुग्णांची संख्या आठ लाखांपेक्षा कमी झाली असून करोनातून बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क््यांहून अधिक झाले आहे.

देशात सध्या सात लाख ९८ हजार ६५६ उपचाराधीन रुग्ण असून हे प्रमाण एकूण बाधितांच्या २.६८ टक्के इतके आहे. करोनातून बरे होण्याचे प्रमाण ९६.०३ टक्क््यांवर पोहोचले आहे.

करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या सलग ३६ व्या दिवशी करोनाची लागण होण्याच्या संख्येपेक्षा अधिक आहे. आतापर्यंत करोनातून दोन कोटी ८५ लाख ८० हजार ६४७ जण बरे झाले असून मृत्युदर १.२९ टक्के इतका आहे. देशात गेल्या २४ तासांत करोनामुळे १५८७ जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी ६३६ जण महाराष्ट्रातील आहेत. तर आतापर्यंत तीन लाख ८३ हजार ४९० जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी एक लाख १६ हजार ०२६ जण महाराष्ट्रातील आहेत, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.