News Flash

करोनावरील औषधे करमुक्त

करोना प्रतिबंधक लशींवरील पाच टक्के जीएसटी दर कायम ठेवण्यावर बैठकीत सहमती झाली.

औषधे, प्राणवायूनिर्मितीची उपकरणे, करोना नमुना चाचणी संच आणि अन्य सामग्रीवरील वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दरांमध्ये जीएसटी परिषदेने मोठी कपात केली.

उपकरणांवर फक्त ५ टक्के आकारणी; जीएसटी परिषदेचा निर्णय

नवी दिल्ली : करोनावरील टोसिलिझुमॅब आणि ‘म्युकरमायकोसिस’वरील अ‍ॅम्फोटेरिसिन-बी या औषधांना वस्तू आणि सेवाकरातून मुक्त करण्याचा आणि प्राणवायू, प्राणवायूनिर्मिती उपकरणांवरील कर ५ टक्क््यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. लशींवरील ५ टक्के कर मात्र कायम ठेवण्यात आला आहे.

करोना आणि म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या साथरोगांशी संबंधित औषधे आणि उपकरणांवर असलेला १८ आणि १२ टक्के जीएसटी ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याची माहिती शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. औषधे, प्राणवायूनिर्मितीची उपकरणे, करोना नमुना चाचणी संच आणि अन्य सामग्रीवरील वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दरांमध्ये जीएसटी परिषदेने मोठी कपात केली. नवे कर दर ३० सप्टेंबर २०२१पर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय वस्तू व सेवा कर परिषदेच्या शनिवारी झालेल्या ४४ व्या बैठकीत घेण्यात आला.

उपकरणांवर किती कर?

वैद्यकीय प्राणवायू, देशी बनावटीची वा आयात केलेली प्राणवायू विलगीकरण यंत्रे, श्वसन यंत्रे, श्वसन यंत्रांचे मुखकवच, कॅन्युला (नळी), हेल्मेट, बी-पॅप यंत्र, नेझल कॅन्युला, नमुना चाचणी संच, ऑक्सिमीटर, तापमापक, हात जंतूरोधक, विद्युतदाहिनीसाठी वापरले जाणारे साहित्य आदींवरील जीएसटीही १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणला आहे.

लशींवरील जीएसटी कायम : करोना प्रतिबंधक लशींवरील पाच टक्के जीएसटी दर कायम ठेवण्यावर बैठकीत सहमती झाली. बहुतांश राज्यांनी लशींवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर निर्णय घेण्यासाठी परिषदेने राज्यांच्या अर्थमंत्र्यांची विशेष समिती नेमली होती. या समितीने लशींवरील जीएसटी दर कमी न करण्याचा अहवाल परिषदेला दिला होता.

महाराष्ट्राच्या मागणीमुळेच…

मुंबई : करोना औषधे आणि संबंधित उपकरणांवरील जीएसटीत कपात करण्याची महाराष्ट्र सरकारची मागणी मान्य के ल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले. पवार यांच्या मागणीनंतरच आठ सदस्यीय मंत्रिगटाची स्थापना झाली होती. या मंत्रिगटाने कर कमी करण्याची शिफारस के ली होती.

कर रद्द

करोनावरील टोसिलिझुमॅब, म्युकरमायकोसिसवरील अ‍ॅम्फोटेरिसिन-बी या औषधांवरील ५ टक्के जीएसटी रद्द करण्यात आला आहे.

करकपात…

’रक्तातील गुठळ्यांना प्रतिबंध करणारे हेपॅरिन आणि करोनावरील रेमडेसिविर या औषधांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के. ’केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शिफारस केलेल्या अन्य औषधांवरही आता ५ टक्के जीएसटी. रुग्णवाहिकेवरील २८ टक्के जीएसटी १२ टक्क्यांवर. केंद्र सरकार लशींच्या ७५ टक्के  मात्रा खरेदी करून मोफत लसीकरण करणार असल्याने त्यांवरील पाच टक्के कराचा अतिरिक्त बोजा नागरिकांवर पडणार नाही.

– निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2021 1:52 am

Web Title: corona virus infection tocilizumab mucormycosis amphotericin b nirmala sitharaman union finance minister akp 94
Next Stories
1 काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस शहीद
2 मानवाधिकार चळवळीला बळ देणाऱ्या युवतींचा ‘पुलित्झर’कडून गौरव
3 फ्लॉइड हत्येच्या धाडसी चित्रीकरणाची दखल
Just Now!
X