News Flash

महालसीकरणास प्रारंभ

जगातील या महालसीकरण मोहिमेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी दूरचित्रसंवाद माध्यमाद्वारे केले.

  • करोना उच्चाटनाच्या लढ्यातील पहिले पाऊल
  • एक लाख ९१ हजार योद्ध्यांना लस
  • पहिल्या दिवशी देशभरात उत्साह

 

गेले दहा महिने सुरू असलेले करोना साथीविरोधातील युद्ध जिंकून या नव्या रोगाला हद्दपार करण्याच्या महालसीकरण मोहीमेस देशभर शनिवारी सुरुवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी देशभरातील एक लाख ९१ हजार करोना योद्ध्यांना लशीची पहिली मात्रा टोचण्यात आली.

जगातील या महालसीकरण मोहिमेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी दूरचित्रसंवाद माध्यमाद्वारे केले. या वेळी त्यांनी देशातील अनेक लसीकरण केंद्रांशी संवाद साधला. भारतात तयार करण्यात आलेल्या या लशींमुळे करोनावर निर्णायक विजय मिळविता येईल, मात्र लस टोचून घेतल्यानंतरही मुखपट्ट्यांचा वापर करणे आणि अंतरनियम पाळणे गरजेचे आहे, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. देशातील प्रत्येक जण आनंदी आणि निरोगी राहू दे अशा अर्थाचा संस्कृत श्लोक म्हणत मोदी यांनी दूरनियंत्रकाने लसीकरणाचा प्रारंभ केला.

लसीकरणाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी ५.३० पर्यंत ३,३५२ सत्रांमध्ये देशभरातील एक लाख ९१ हजार १८१ करोना योद्ध्यांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली. लष्करातील ३,१२९ डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनाही लस टोचण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले.

दिल्लीच्या ‘एम्स’ रुग्णालयातील ३४ वर्षीय स्वच्छता कर्मचारी मनीष कुमार यांना लस टोचून लसीकरण मोहीमेस प्रारंभ करण्यात आला. ते देशातील पहिले लस मानकरी ठरले आहेत, असे केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले. दरम्यान, गुंतागुंतीची आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास नुकसानभरपाई देण्यासाठी कोव्हॅक्सिन घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून संमतीपत्रे घेण्यात आली.

भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) सीरमने उत्पादित केलेल्या ऑक्सफर्डच्या ‘कोव्हिशिल्ड लशीला आणि भारत बायोटेकने देशात विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली होती.

उत्सवी वातावरण

लसीकरणानिमित्त लडाख या उंचीवरील प्रदेशापासून किनारपट्टीवरील केरळ राज्यापर्यंत जवळपास सर्वच लसीकरण केंद्रांवर उत्साहाचे, उत्सवी वातावरण होते. अनेक रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांवर रंगीबेरंगी पताका, फुले आणि फुग्यांची सजावट करण्यात आली होती. अनेक केंद्रांवर मिठाईचेही वाटप करण्याबरोबरच प्रार्थनाही घेण्यात आल्या. काही ठिकाणी लशीच्या पेट्यांची पूजाही करण्यात आली.

 

देशातील पहिले मानकरी

दिल्लीच्या ‘एम्स’ रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी मनीष कुमार हे लस टोचून घेणारे देशातील पहिले करोनायोद्धे ठरले, असे आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले. त्यांना भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीची मात्रा देण्यात आली. ‘‘मी काल चांगली झोप घेतली आणि सकाळी लसीकरणासाठी आलो. लशीसाठी नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्यापैकी अनेक जण प्रथम लस घेण्यास घाबरत होते. मग मी वरिष्ठांकडे गेलो आणि मला प्रथम लस द्या, असे सांगितले. लस घेण्यास कचरणाऱ्यांना, भीतीचे कारण नाही, हे मला सिद्ध करून दाखवायचे होते’’, अशा भावना मनीष कुमार यांनी व्यक्त केल्या. छत्तीसगडमध्ये रायपूर येथील डॉ. बी. आर. आंबेडकर स्मरणार्थ रुग्णालयातील तुलसा तांडी या स्वच्छता कर्मचारी पहिला मानकरी ठरल्या, तर तेलंगणामध्ये महिला स्वच्छता कर्मचारी पहिल्या मानकरी ठरल्या.

लवकरच सर्वांना लस,  निर्बंध आवश्यक: मुख्यमंत्री

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील करोना लसीकरण केंद्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. सर्वांना लस देण्यात येईल, परंतु करोना निर्बंध पाळणेही आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. करोना उपचार केंद्रामधील आहारतज्ज्ञ डॉ. मधुरा पाटील यांना मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत पहिली लस टोचण्यात आली. टाळ्यांच्या गजरात करोनायोद्ध्यांच्या लसीकरणाचा शुभारंभ झाला.

 

करोना साथीचा अंत करण्यासाठी आपण पहिले क्रांतिकारक पाऊल टाकत आहोत. केंद्राने दिलेल्या लशी सुरक्षित असून आणखी दोन ते तीन कंपन्यांची लस उपलब्ध होणार आहे.  – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 2:12 am

Web Title: corona virus infection vaccine prime minister narendra modi television communication akp 94
Next Stories
1 कृषी कायदे समितीवर नवे सदस्य नेमण्याची मागणी
2 पहिल्या दिवशी लसीकरण यशस्वी, १.९० लाखापेक्षा जास्त नागरिकांना करोना प्रतिबंधक लसीचे डोस
3 कोव्हॅक्सिनला विरोध: भारत बायोटेकची घोषणा; साईड इफेक्ट झाल्यास देणार नुकसान भरपाई
Just Now!
X