जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. पूनम  सिंह यांची भूमिका

करोना प्रतिबंधक वर्तनाचे नियम पाळले, तर विषाणूचा संसर्ग रोखणे शक्य आहे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया विभागाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेतरपाल सिंह यांनी सांगितले.

चाचण्या, संपर्क शोध, विलगीकरण, उपचार या उपायांवर भर द्यावा लागणार आहे, असे स्पष्ट करून त्यांनी सांगितले, की करोनाच्या आताच्या साथीतून आणखी काही गोष्टी सामोऱ्या आल्या असून त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी सामाजिक अंतर, हात साबणाने धुणे, शिंकताना व खोकताना कण पसरणार नाहीत याची काळजी घेणे, सातत्याने मुखपट्टीचा वापर करणे गरजेचे आहे.

भारतात १ लाख ४५ हजार ३८४ नवीन रुग्ण सापडले असून एकूण संख्या १ कोटी ३२ लाख ५ हजार ९२६ झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या साडेसहा महिन्यात उच्चांकी म्हणजे १० लाखांवर गेली आहे. पूनम खेतरपाल सिंह यांनी सांगितले, की सामाजिक अंतरासह, सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणे विषाणू रोखण्यासाठी गरजेचे आहे. लोकांच्या हालचालींवर मर्यादा आणल्यास लोकांमधील संपर्क कमी होऊन प्रसार कमी होऊ शकतो. जोखीम निवारण उपाययोजना करताना त्याला वैज्ञानिक आधार असण्याची गरज आहे. कारण अन्न सुरक्षा, लोकांची आर्थिक स्थिती याचा सारासार विचार आपत्कालीन निर्बंध लावताना करण्याची गरज आहे. टाळेबंदीविषयी विचारले असता त्यांनी सांगितले, की अशा प्रकारचे उपाय वापरताना स्थानिक साथरोगशास्त्रीय जोखमीचा विचार करण्याची गरज आहे.