भारतात पाच कोटींपेक्षा अधिक नागरिकांकडे व्यवस्थित हात धुण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना करोनाची लागण होण्याची आणि त्यांच्यामुळे इतरांना हा आजार जडण्याचा जास्त धोका आहे, असा दावा एका संशोधन अभ्यासातून करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनच्या (आयएचएमई) संशोधकांनी हा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं की, “मध्यम आणि त्याखालील दरडोई उत्पन्न असणाऱ्या देशांमधील दोन अब्जपेक्षा अधिक लोकांकडे साबण आणि स्वच्छ पाण्याची सोय नाही. त्यामुळे श्रीमंत देशातील लोकांच्या तुलनेत त्यांच्यामध्ये करोनाचं संक्रमण होण्याचा धोका अधिक आहे. ही संख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश आहे.”

एन्व्हार्मेंटल हेल्थ पर्सपेक्टिव्ह जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, “अफ्रिका आणि आशियातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांजवळ चांगल्याप्रकारे हात धुण्याची व्यवस्था नाही.” आयएचएमईचे प्राध्यापक मायकल ब्राउएर यांनी म्हटलं की, “करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी महत्वाच्या उपायांमध्ये हात धुणे हा एक महत्वाचा उपाय आहे. पण अनेक देशांमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही कारण त्या देशांमध्ये आरोग्याच्या सुविधाच मर्यादित स्वरुपात आहेत, हे निराशाजनक आहे. दरम्यान, ४६ देशांमधील निम्म्याहून अधिक लोकसंख्येकडे साबण आणि स्वच्छ पाणी उपलब्ध नाही,” असंही त्यांनी म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त दिलं आहे.

त्यानुसार, भारत, पाकिस्तान, चीन, बांगलादेश, नायजेरिया, इथियोपिया, कांगो आणि इंडोनेशिया या देशांपैकी प्रत्येक देशामध्ये पाच कोटींपेक्षा अधिक लोकांकडे हात धुण्याची व्यवस्था नाही. ब्राउएर यांच्या म्हणण्याप्रमाणे, “हँड सॅनिटायझर सारख्या सुविधा तर गरजेच्या गोष्टी आहेत. करोनापासून बचावासाठी दीर्घकालीन उपायांची गरज आहे. हात धुण्याची योग्य सुविधा नसल्याने प्रत्येक वर्षी ७ लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होतो.”