करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी हे संकट टळलेलं नाही. गुजरातमधील अहमदाबाद येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातील  तीन सदस्यांचा पाच दिवसांमध्ये करोनामुळे मृत्यू झाला आहे. अहमबादामध्ये करोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. करोनाच्या या दुसऱ्या लाटेचा फटका करोनायोद्धा म्हणून जीवाचं रान करणाऱ्या पोलीस कॉन्सटेबल धवल रावल यांच्या कुटुंबालाही बसला आहे.

आधी धवल यांच्या आई, वडिलांना आणि त्यानंतर भावाचा करोना संसर्गाने मृत्यू झाला. अवघ्या पाच दिवसांमध्ये रावल कुटुंबातील तीन सदस्य मृत्यूमुखी पडल्याने रावल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. करोनाची लागण झाल्यानंतर धवल यांच्या पालकांना आणि भावाला अहमबादामधील ठक्करनगरमधील खासगी रुग्णालयामध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपाचारादरम्यान तिघांचीही प्रकृती खालावत गेली. १४ नोव्हेंबर रोजी धवल यांच्या आईचे करोनाने निधन झालं. त्यानंतर दोनच दिवसात त्यांचे वडीलही करोनाविरुद्धची लढाई हरले. त्यानंतर पुढच्याच दिवशी धवल यांच्या भावाचाही करोनामुळे मृत्यू झाला. अवघ्या पाच दिवसांमध्ये एकाच घरातील तीन व्यक्ती करोनामुळे दगावल्या. रावल कुटुंबातील तीन व्यक्तींचा पाच दिवसांमध्ये मृत्यू झाल्याची बातमी अहमबादमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दिवाळीनंतर अहमबादमधील करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अहमबादामध्ये रविवारी ३४१ नवे रुग्ण आढळून आले. शहरामध्ये रविवारपर्यंत ४७ हजार ३०९ रुग्ण आढळून आले होते. अहमबादामध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एक हजार ९६८ पर्यंत पोहचली आहे. गुजरातमधील करोनाबाधितांची संख्या बुधवारपर्यंत दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळले असून त्यापैकी एक लाख ८२ हजार रुग्णांनी करोनावर मात केली आहे.