देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेवरून मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगावर कठोर ताशेरे ओढले. करोना फैलावास केवळ आयोगच जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा, अशा शब्दांत न्यायालयाने आयोगाला फटकारले.

येत्या २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान करोना नियमांच्या पालनाचे निर्देश देण्याच्या मागणीसाठी तमिळनाडूचे परिवहनमंत्री आणि अण्णाद्रमुकचे उमेदवार एम. आर. विजयभास्कर यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी आणि न्या. एस. राममूर्ती यांच्या खंडपीठाने सोमवारी सुनावणी घेतली. करोना नियमांचे पालन करून मतमोजणी प्रक्रिया पार

पाडण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत, असे निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्यायालयात सांगताच न्यायालयाने आयोगाची कानउघाडणी केली.

राजकीय पक्षांना मोठ्या प्रचारसभा आयोजित करण्याची परवानगी देऊन निवडणूक आयोगाने करोनाच्या दुसऱ्या लाटेला मार्ग मोकळा करून दिला. करोनाच्या दुसऱ्या लाटेला आयोगालाच जबाबदार धरले पाहिजे, असे मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी नमूद केले. निवडणूक आयोग ही सर्वाधिक बेजबाबदार संस्था आहे, अशी टिप्पणी करत न्यायालयाने २ मे रोजीची मतमोजणी थांबवण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा आयोगाला दिला.

याआधी पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेदरम्यान करोना नियमांचे पालन होत नसल्याबद्दल कोलकाता उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली होती. निवडणुकांदरम्यान करोना नियम पालनाबाबतच्या तीन याचिकांवर मुख्य न्यायाधीश टी. बी. एन. राधाकृष्णन यांच्या खंडपीठाने २२ एप्रिलला सुनावणी घेतली होती. करोना नियम पालनाबाबत केवळ परिपत्रक काढणे आणि बैठक घेणे पुरेसे नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली होती.

तमिळनाडू, बंगालमध्ये रुग्णवाढ

तमिळनाडू, पश्चिम बंगालसह नुकतेच मतदान झालेल्या राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदविण्यात येत आहे. बंगालमध्ये गेल्या २४ तासांत १५,८८९ रुग्ण आढळले. राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येचा हा उच्चांक आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी सोमवारी ७५ टक्के मतदान झाले. मतदानाचा आणखी एक टप्पा २९ एप्रिलला आहे. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने निवडणूक आयोगाने ‘रोड शो’वर बंदी घातली आहे. तसेच ५०० जणांहून अधिक उपस्थितांच्या प्रचारसभेवरही आयोगाने बंदी घातली आहे. तमिळनाडूमध्ये रविवारी करोनाचे १५००० रुग्ण आढळले होते.

देशात ३,५२,९९१ नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात करोना रुग्णसंख्या आणि बळींनी सोमवारी नवा उच्चांक नोंदवला. गेल्या २४ तासांत देशात ३,५२,९९१ रुग्ण आढळले, तर २,८१२ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील उपचाराधीन रुग्णसंख्येने २८ लाखांचा टप्पा ओलांडला.

ममतांकडून स्वागत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. सध्याच्या करोनास्थितीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगच जबाबदार आहेत, असा आरोप करत ममता यांनी पश्चिम बंगालमधून केंद्रीय सुरक्षा पथके मागे घ्यावीत, अशी मागणी केली.

कर्नाटकमध्ये १४ दिवसांची टाळेबंदी

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने मंगळवारी रात्रीपासून १४ दिवसांची टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत लस देण्याची घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी केली. कर्नाटकमध्ये रविवारी ३४,८०४ रुग्ण आढळले, तर १४३ रुग्णांचा मृत्यू झाला.