पुन्हा टाळेबंदीची गरज नसल्याचे तज्ज्ञ समितीचे मत

 नवी दिल्ली :सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले गेले तर करोनाची साथ पुढील वर्षांच्या सुरुवातीपर्यंत नियंत्रणात येऊ शकेल, असे केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने म्हटले आहे. आता जिल्हा किंवा राज्य पातळीवर टाळेबंदीची आवश्यकता नाही, असेही या समितीने स्पष्ट केले.

‘करोनाच्या साथीचा भारतातील फैलाव : रोगनिदान आणि टाळेबंदीचा परिणाम’ या विषयावर अभ्यास करण्यासाठी आयआयटी, हैदराबादचे प्राध्यापक एम. विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या दहा सदस्यीय समितीने आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. फेब्रुवारीपर्यंत करोनाची साथ नियंत्रणात आणता येऊ शकेल, असा अंदाज समितीने व्यक्त केला आहे.

देशात टाळेबंदी लागू केली नसती तर येत्या जूनपर्यंत १ कोटी ४० लाख लोकांना संसर्ग झाला असता. त्याचबरोबर आरोग्य व्यवस्थेवर अभूतपूर्व ताण पडला असता. परिणामी, मृतांची संख्या आणखी वाढली असती. टाळेबंदीसाठी आपण मेपर्यंत थांबलो असतो तर गेल्या जूनमध्येच ५० लाख लोकांना संसर्ग झाला असता, असेही समितीच्या अहवालात म्हटले आहे.

आपण सर्वानी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले तर तर पुढील वर्षांच्या सुरूवातीस करोनाच्या साथीवर नियंत्रण येऊ शकेल आणि फेब्रुवारीच्या अखेरीस रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज समितीने व्यक्त केला आहे.   करोना आणि हवामान यांच्यातील परस्पर संबंध, त्याचबरोबर या विषाणूच्या संरचनेत थंड वातावरणात कोणते बदल संभवतात, याची माहिती अद्याप आपल्याला झालेली नाही. सर्वसाधारणपणे थंड वातावरणात विषाणूजन्य आजारांचा त्रास अधिक होतो. म्हणूनच आपण वैयक्तिक स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक नियमांचे पालन सुरू ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा, या विषाणूचा प्रादुर्भाव वाढेल, असे या समितीचे प्रमुख प्रा.  विद्यासागर यांनी सांगितले. आरोग्य सुविधांच्या अभावामुळे मोठा धोका निर्माण झाल्याशिवाय राज्य किंवा जिल्हा स्तरावर पुन्हा टाळेबंदी लागू करू नये, असेही प्रा. विद्यासागर यांनी स्पष्ट केले.

आगामी उत्सव आणि हिवाळ्यात संसर्गाची शक्यता वाढू शकते, परंतु योग्य सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केल्यास आपल्याला सर्व व्यवहार पुन्हा सुरू करता येतील, असेही समितीने म्हटले आहे.

रुग्णस्थिती

’नवे रुग्ण : ६१,८७१

’एकूण रुग्ण : ७४,९४,५५१

’बरे झालेले एकूण रुग्ण : ६५,९७,२०९

’२४ तासांतील मृत्यू : १,०३३

’एकूण मृत्यू : १,१४,०३१

अभ्यासाचे ‘मॉडेल’ : या तज्ज्ञ समितीने करोना साथीच्या अभ्यासासाठी प्रत्यक्ष पुराव्यांवर आधारित गणितीय ‘मॉडेल’ विकसित केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील हे ‘सुपर मॉडेल’ टाळेबंदीची वेळ, टाळेबंदीला पर्याय, स्थलांतरीत कामगारांच्या गावाकडे परतण्याचा परिणाम आणि प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करण्याचे संभाव्य दुष्परिणाम आदी प्रमापकांवर आधारित आहे.

..म्हणून बळींची संख्या कमी!

आपल्या देशात सप्टेंबरच्या अखेरीस दहा लाख रुग्ण आढळेपर्यंत आपण करोना साथीला नियंत्रणात आणण्यासाठी वैद्यकीय सुविधा आणि चाचण्यांसह सर्व बाबतीत सक्षम झालो होतो. टाळेबंदी लागू केली नसती तर कमी कालावधीत जास्त रुग्ण दगावले असते आणि बळींचा आकडा २६ लाखांपर्यंत गेला असता, असे निरीक्षण समितीने नोंदवले.