देशातील करोनाची समस्या आटोक्यात आणल्याचे केंद्र सरकार सातत्याने भासवत आहे. परिस्थिती जेवढी वाईट आहे असे सांगितले जाते, तेवढी ती नाही, असे वारंवार लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, समस्या गंभीर असल्याचे मान्य करून त्याविरोधात लढा द्यायला हवा, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले.

करोनाच्या संदर्भातील विविध देशांतील स्थिती जाणून घेण्यासाठी ‘डॉक्टर्स डे’निमित्त राहुल गांधी यांनी विपीन कृष्णन (एम्स, दिल्ली), अनू रागनत (न्यूझीलंड), नरेंद्र सिंह (ऑस्ट्रेलिया) आणि सेर्लिमोल पुर्वेदी (ब्रिटन) अशा चार परिचारकांशी दूरचित्रवाणीसंवादाद्वारे चर्चा केली. डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक हे करोनाविरोधातील ‘अहिंसक योद्धे’ असल्याचे ते म्हणाले. करोनामुळे वैद्यकीय क्षेत्रात निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीचा तसेच कुटुंबावर झालेल्या परिणामांची माहिती परिचारकांनी दिली.

दिल्लीत करोनाचे रुग्ण वाढत असताना नमुना चाचण्या मात्र तुलनेत कमी होत असल्याचा मुद्दा राहुल गांधी यांनी मांडला. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, नमुना चाचणी झाल्याशिवाय रुग्णांवर उपचार करणे कठीण आहे. कोण करोनाबाधित आहे आणि कोणाला अन्य आजार झाला आहे हे समजणार कसे? चाचणी झाल्याशिवाय रुग्णांना नेमके कुठल्या विभागात ठेवायचे हे तरी कसे ठरवणार? अशी चिंता डॉक्टर व्यक्त असत असल्याचे राहुल यांनी सांगितले.

वैद्यकीय सेवांवर ताण

करोनातून बरे होत असलेले ‘एम्स’मधील परिचारक विपीन कृष्णन यांनी दिल्लीतील करोनाच्या स्थितीबद्दल बोलताना देशभरातील वैद्यकीय सेवांवर किती ताण पडलेला आहे, याचीही माहिती दिली. देशात १२ लाख नोंदणीकृत डॉक्टर्स तर ३७ लाख नोंदणीकृत परिचारक आहेत. देशात १५०० रुग्णांमागे एक डॉक्टर तर १ हजार रुग्णांमागे १.७ परिचारक आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार हे प्रमाण एक हजार रुग्णांमागे १ डॉक्टर व ३ परिचारक असे असायला हवे, असे कृष्णन म्हणाले.

थकलो पण, लढतोय..

खासगी रुग्णालयात परिचारिकांच्या वेतनात कपात केली जात आहे. करोनाबाधित होऊन मृत्यू झालेल्या आरोग्यसेवकांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. अशा अनेक समस्यांना करोनायोद्धय़ांना सामोरे जावे लागत असल्याचेही कृष्णन यांनी सांगितले. आम्ही थकलो आहोत आणि कुठलेही भय न बाळगता करोनाविरोधात लढत आहोत. या साथरोगाविरोधात आपण सगळेच जिंकू याची खात्री आहे, अशा आशावादही कृष्णन यांनी व्यक्त केला.