शेअर बाजारात घसरण; बळींची संख्या ४२५

चीनमध्ये करोना विषाणूचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात पसरला असून, बळींची संख्या ४२५ वर पोहोचली आहे. रुग्णसंख्या २० हजारांहून अधिक झाल्याने चीनची करोनाशी झुंज सुरू असून, बाजार कोसळत असल्याने आर्थिक आव्हानही उभे ठाकले आहे. विषाणूच्या प्रसारामुळे चीनमध्ये सगळे शेअर बाजार कोसळले असून पडझड रोखण्यासाठी आर्थिक बाजारपेठात सरकारने मोठय़ा प्रमाणात पैसा ओतला आहे.

चीनमध्ये करोनाच्या लागणीमुळे सोमवारी ६४ बळी गेले असून मृतांची संख्या ३६१ वरून ४२५ झाली आहे.  या रोगाचे निदान निश्चित झालेले एकूण १७,२०५ रुग्ण आहेत. इतर देशांनी चीनमधून आलेल्यांना परत पाठवण्याचे धोरण सुरू केले आहे. हुबेई प्रांतात एक हजार खाटांचे रुग्णालय दहा दिवसांत उभारले असून १५०० खाटांचे दुसरे रुग्णालय बुधवारी सुरू होणार आहे. मृतांची व लागण झालेल्या रुग्णांची संख्या  झपाटय़ाने वाढत असल्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च मंडळाची दुसऱ्यांदा बैठक घेतली. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता जनयुद्धच छेडण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले. पॉलिटब्यूरोच्या बैठकीत त्यांनी सांगितले की, जे लोक कर्तव्यात कसूर करतील त्यांना शिक्षा केली जाईल. पीपल्स लिबरेशन आर्मीचे वैद्यकीय पथक वुहान येथे पोहोचले असून आधीच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना थोडी विश्रांती देण्यात येत आहे.

चीनच्या शांघाय शेअर बाजाराचा निर्देशांक नववर्षांच्या पहिल्याच दिवशी ८ टक्क्यांनी घसरला. चीनच्या मध्यवर्ती बँकेने बाजारपेठेत १७३ अब्ज डॉलर्स ओतण्याचे ठरवले असतानाही शेअर बाजार खाली आला. करोनाचा प्रभाव व परिणाम कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून त्यात यश येईल असे राष्ट्रीय विकास व सुधारणा आयोगाचे प्रमुख लियान वेलियांग यांनी म्हटले आहे. नेचर नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार या रोगातील करोना विषाणू हे वटवाघळातील विषाणूशी साधम्र्य दाखवणारे आहेत.

चीनबाहेर करोनाचा दुसरा बळी हाँगकाँगमध्ये

हाँगकाँग : चीनबाहेर करोना विषाणूचा दुसरा बळी हाँगकाँगमध्ये मंगळवारी गेला आहे. स्थानिक पातळीवर विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चीनबाहेर करोनाचा पहिला बळी फिलीपाइन्समध्ये गेला होता.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात पहिला रुग्ण

कराची : चीनमधून परतलेल्या पाकिस्तानातील अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांला करोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील या विद्यार्थ्यांला स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे.

कुठे, किती रुग्ण? सिंगापूर- २४, जपान- २०, थायलंड- १९, हाँगकाँग- १७ (एक मृत्यू), दक्षिण कोरिया- १६, ऑस्ट्रेलिया- १२़, मलेशिया- १०, तैवान- १०, व्हिएतनाम- १०, भारत- ३,  नेपाळ- १, फिलिपाइन्स- २ (एकाचा मृत्यू), श्रीलंका- १, कंबोडिया- १,   कॅनडा- ४़, अमेरिका- ११, जर्मनी- १२, फ्रान्स- ६, ब्रिटन- २, इटली- २, रशिया- २, स्पेन- १, स्वीडन- १, संयुक्त अरब अमिराती- ५.

मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात चाचणीची सुविधा

मुंबई : करोना विषाणूच्या चाचणीसाठी कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळा सिद्ध झाली असून एका रुग्णाच्या तपासण्याही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान (एनआयव्ही) संस्थेसह आता ही सुविधा मुंबईतही उपलब्ध झाली आहे. दरम्यान, राज्यात २१ करोना विषाणू संशयित रुग्ण आढळले असून यातील १९ जणांना तपासणीअंती घरी पाठविले आहे.