करोना साथरोगाचे आक्रमण परतवून लावण्यासाठी राज्य सरकार आणि सरकारच्या यंत्रणांनी आक्रमकपणे केलेल्या लढाईला यश येऊ लागले आहे. मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्येत घट दिसून येत असून पूर्ण बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण देशभरात करोना व्हायरसचे १३,५०० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही रुग्ण संख्या वाढत आहे. करोना व्हायरसमुळे देशात आतापर्यंत ४४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Live Blog

21:24 (IST)17 Apr 2020
मालेगावात करोना मृत्यूंची संख्या चार वर

मालेगावात शुक्रवारी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार नव्याने १४ जण करोनाबाधित आढळून आले आहेत.  यामध्ये आज सकाळी मृत पावलेल्या एका वृध्द डॉक्टरचा तसेच १३ एप्रिल रोजी मृत्यू झालेल्या महिलेचा समावेश आहे. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता चार झाली आहे. आतापर्यंत मालेगाव शहरात आढळून आलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६२ झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ७० झाली आहे.

21:14 (IST)17 Apr 2020
‘अत्यावश्यक’ सेवांतील कर्मचाऱ्यांना त्वरित वेतन : अजित पवार

आरोग्यविषयक कामांची गरज लक्षात घेऊन चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन योजनेचा २५ टक्के निधी आरोग्यविषयक कामांकडे वळवण्यात येणार आहे. तर आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, पोलीस, होमगार्ड व इतर विभागातील अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन-मानधन तात्काळ देण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. करोनाच्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीने हे निर्णय घेतल्याची माहिती समितीप्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली

21:13 (IST)17 Apr 2020
पाच महिन्यांसाठी महाराष्ट्राला दरमहा दहा हजार कोटींचे अनुदान द्या; उपमुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

करोनाविरुद्धचा लढा महाराष्ट्र सर्व आघाड्यांवर पूर्ण क्षमतेने लढेल आणि जिंकेलही, त्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक आघाडीवर महाराष्ट्राला सहकार्य करावे, अशी विनंती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधआन नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना मिळणारी जीएसटीची थकबाकी मिळावी, जीएसटीची पुढील रक्कम प्रत्येक महिन्याला वेळेवर मिळावी, राज्याच्या उत्पन्नातील अपेक्षित तूट लक्षात घेऊन पुढील पाच महिन्यांसाठी महाराष्ट्राला दरमहा दहा हजार कोटींचे अनुदान दिले जावे, आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी वित्तीय तूटीची मर्यादा ५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात यावी, आदी मागण्या त्यांनी पंतप्रधानांकडे केल्या आहेत.

21:08 (IST)17 Apr 2020
अंबरनाथमध्ये मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यास करोनाची बाधा

राज्यातील करोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. मुंबईत रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. आज अंबरनाथमध्ये आणखी एक नवा रुग्ण आढळला असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा रुग्ण मुंबई महापालिका कर्मचारी आहे.

19:40 (IST)17 Apr 2020
मुंब्र्याहून सोलापुरात आलेल्या पोलिसाला करोनाची बाधा

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे नेमणुकीस असलेला पोलीस कर्मचारी स्वतःला बरे वाटतनाही म्हणून १४ दिवसांच्या गृह विलगीकरणात असताना मुंब्र्याहून दुचाकीने सोलापुरात स्वगृही आला. नंतर त्याचा आजार वाढला असता वैद्यकीय तपासणीअंती त्याला करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार स्पष्ट होताच प्रशासनाने करोनाबाधित पोलीस कर्मचारी राहात असलेल्या रविवार पेठेतील जोशी गल्लीचा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून उपाययोजना हाती घेतल्या.

19:29 (IST)17 Apr 2020
शहापुरातील एकाला कोरोनाची लागण

शहापुरातील एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान करोनाबाधिताच्या सहवासात आलेल्या ११ जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांना भिवंडी येथे स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती तालुका अधिकारी डॉ. धानके यांनी दिली.

19:24 (IST)17 Apr 2020
पुण्यात करोनामुळे आणखी एक मृत्यू, एकूण संख्या 48 वर

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई व पुणे ही या दोन्ही शहरात रुग्ण संख्येसह मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आज पुण्यातील लोहिया नगर येथे एका 44 वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला. हा व्यक्ती अन्य आजारानेही ग्रासलेला होता. याबरोबर शहरातील मृत्यूंची संख्या आता 48 वर पोहचली आहे.

19:18 (IST)17 Apr 2020
नवी मुंबईत दिवसभरात ५ रुग्ण वाढले. शहरात एकूण ५९ करोनाबाधित

राज्यातील करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. आज नवी मुंबईत दिवसभरात ५ रुग्ण वाढले. तर शहरात एकूण ५९ करोनाबाधित आहेत.

18:30 (IST)17 Apr 2020
लॉकडाउनमध्ये अडकलेल्या ऊसतोड मजुरांना अखेर स्वगृही पाठवण्याचा निर्णय

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या घोषणेमुळे साखर कारखाना परिसरात  25 दिवसांपासून अडकून पडलेल्या ऊसतोड मजुरांना वैद्यकीय तपासण्या करून स्वगृही, गावाकडे पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे बीड व अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास एक लाख मजुरांना दिलासा मिळणार आहे.

18:13 (IST)17 Apr 2020
देशभरात चोवीस तासांत 1 हजार 076 नवे रुग्ण, 32 मृत्यू

जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. करोनाबाधितांच्या संख्येसह यामुळे मृत्यू झालेल्याची संख्या देखील वाढतच आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार चोवीस तासांत देशभरात 1 हजार 076 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून 32 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या बरोबरच देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 13 हजार 835 वर पोहचली आहे.

16:27 (IST)17 Apr 2020
“तुमच्या धमक्यांना घाबरुन घरी बसायला मी झायरा वसीम नाही”, बबिता फोगटचं सणसणीत उत्तर

भारतावर सध्या करोनाचं संकट असताना याच मुद्द्यावरुन भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगट सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत असून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. बबिता फोगटचं ट्विट यासाठी कारणीभूत ठरलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून बबिता फोगटने तबलिगी जमातवर निशाणा साधला होता. यानंतर अनेकजण बबिता फोगटचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्याची मागणी करत आहेत. इतकंच नाही तर तिला फोन, मेसेज करुन धमकावलंही जात आहे. बबिता फोगटने धमकावणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिलं असून आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. बबिता फोगटने ट्विटरला व्हिडीओ अपलोड करत आपली बाजू मांडली असून धमकावणाऱ्यांना तुमच्या धमक्यांना घाबरुन घरी बसायला मी झायरा वसीम नाही अशा शब्दांत सुनावलं आहे. (सविस्तर वृत्त)

16:26 (IST)17 Apr 2020
“तुमच्या धमक्यांना घाबरुन घरी बसायला मी झायरा वसीम नाही”, बबिता फोगटचं सणसणीत उत्तर
15:23 (IST)17 Apr 2020
रायगड - श्रीवर्धन तालुक्यात करोनाचा पहिला रुग्ण, पनवेल मनपा हद्दीतही चार नवे रुग्ण

रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला आहेे.  श्रीवर्धन तालुक्यात हा रुग्ण आढळला असून वरळी येथून तो गावी आला होता 12 एप्रिल रोजी त्याला कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांची टेस्ट आज पॉझिटिव्ह आली आहे. आता त्यांच्या नातेवाईकांची तपासणी केली जाणार आहे. याचबरोबर पनवेल मनपा हद्दीतही  चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

14:34 (IST)17 Apr 2020
नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये आणखी एक व्यापाऱ्याला करोनाची लागण

नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये आणखी एक व्यापाऱ्याला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पालिकेच्यावतीने माथाडी , व्यापारी यांच्या चाचण्या घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

14:18 (IST)17 Apr 2020
महाराष्ट्रात करोनाचे २८८ नवे रुग्ण, संख्या ३२०० च्याही पुढे

महाराष्ट्रात करोनाचे २८८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ही आता ३२०४ एवढी झाली आहे. मागील १२ तासांमध्ये महाराष्ट्रात करोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनामुळे १९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. महाराष्ट्राच्या काळजीत नक्कीच भर घालणारी ही बातमी आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या रोज वाढते आहे. ३ हजारांपुढे रुग्णसंख्या असलेलं महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.

14:10 (IST)17 Apr 2020
भारतीय लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानाला झापलं

भारतीय लष्कराचे प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी दहशतवादावरुन पाकिस्तानला झापलं आहे. आज भारत आणि संपूर्ण जग करोनाशी लढत असताना पाकिस्तान मात्र दहशतवाद निर्यात करण्यात व्यस्त आहे अशा शब्दांत मुकुंद नरवणे यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे. “आम्ही आमच्या लोकांची मदत करण्यात व्यस्त आहोत. फक्त आमच्या लोकांचीच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये वैद्यकीय मदत आणि औषधांचा पुरवठा करत मदतीचा हात देत आहोत. पण दुसरीकडे पाकिस्तान मात्र फक्त दहशतवाद निर्यात करत आहे. हे योग्य नाही,” असं लष्कर प्रमुखांनी म्हटलं आहे. (सविस्तर वृत्त)

13:18 (IST)17 Apr 2020
लॉकडाउनमध्ये माहेरी जाण्याचा हट्ट, पतीने नकार दिल्याने मुलांसह विहीरीत मारली उडी

करोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने लोकांवर गरजेच्या कामाशिवाय घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले आहेत. मात्र अशा परिस्थितीतही काही लोक घराबाहेर पडण्याचा हट्ट करत आहे. सांगलीत अशीच एक घटना समोर आली असून पतीने माहेरी सोडण्यास नकार दिल्याने महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीमधील जत तालुक्यात ही घटना घडली आहे. (सविस्तर वृत्त)

12:37 (IST)17 Apr 2020
पिपंरी-चिंचवडमध्ये आणखी चार रूग्ण

पिंपरी-चिंचवड शहरात आणखी नवीन ४ करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यात १९ वर्षीय तरुण, ३१ आणि ३३ वर्षीय पुरुष तर ४२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. शहरातील करोना बाधितांचा ऐकून आकडा ४९ वर पोहचला असून १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. ३७ जणांवर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

12:27 (IST)17 Apr 2020
“उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स”, पंकजा मुंडे सरकारविरोधात आक्रमक

भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ऊसतोड कामगारांचा प्रश्न मांडत असून त्यांच्यासाठी तातडीने निर्णय घेतला जावा अशी मागणी सरकारकडे करत आहेत. ऊसतोड कामगारांना लवकरात लवकर घरी पाठवण्याची सोय झाली पाहिजे अशी मागणी पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा केली आहे. उद्याच्या उद्या निर्णय जाहीर करण्यात यावा असंही त्या म्हणाल्या आहेत. (सविस्तर वृत्त)

12:26 (IST)17 Apr 2020
अभिनेत्याचा केंद्र सरकारला सवाल; …तरीही चीनमधून सामानाची आयात का??

चीनपासून फैलाव झालेल्या करोना विषाणूने संपूर्ण जगाला त्रस्त केलं आहे. त्यामुळे प्रत्येक देशाने चीनप्रती नाराजी व्यक्त केली असून काही देशांनी चीनच्या मालावर बहिष्कारही टाकला आहे. यामध्येच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अनुप सोनीने ट्विट करुन, ‘अजूनही चीनमधून सामानाची आयात का होते?’ असा प्रश्न केंद्र सरकारला विचारला आहे. पुढे वाचा...

11:58 (IST)17 Apr 2020
पुण्यात करोनामुळे एकाचा मृत्यू

पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये करोना व्हायरसमुळे ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

11:56 (IST)17 Apr 2020
रुग्णालयात दाखल मुलाला भेटण्यासाठी सहा राज्यांमधून २७०० किमीचा प्रवास

करोनामुळे सध्या देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे रस्त्यावंर खासगी वाहनांना प्रवास करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. अशातच एका ५० वर्षीय महिलेने आपल्या आजारी मुलाला भेटण्यासाठी सहा राज्यांमधून २७०० किमीचा प्रवास केल्याची घटना समोर आली आहे. महिलेचा मुलगा सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) जवान असून जोधपूर येथे तैनात आहे. आजारी असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (सविस्तर वृत्त)

10:39 (IST)17 Apr 2020
Video : एजाज खानला अटक करण्याची मागणी; वाचा नेमकं काय आहे प्रकरण

कायम वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणारा अभिनेता एजाज खान याला अटक करा या मागणीने सोशल मीडियावर जोर धरला आहे. देशात काहीही झालं तरीदेखील मुस्लीम नागरिकांना दोषी धरतात, असं वादग्रस्त वक्तव्य एजाज खानने केलं होतं. त्याने फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करत त्याचं मत मांडलं होतं. मात्र त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल करत अटक करण्याची मागणी केली आहे. पुढे वाचा...

10:34 (IST)17 Apr 2020
‘तबलिगींवर कधी व्यक्त होणार?’ अशोक पंडितांचा जावेद अख्तरांना खोचक सवाल

बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. यावेळीदेखील त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून बृन्मुंबई महानगरपालिकेचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले.  मात्र त्यांचं ट्विट चित्रपट निर्माते अशोक पंडित यांना फारसं रुचलं नसून त्यांनी टिकास्त्र डागलं आहे. ‘सर, तबलिगींवर तुम्ही कधी व्यक्त व्हाल?’ असा खोचक सवाल अशोक पंडित यांनी विचारला आहे. पुढे वाचा...

10:31 (IST)17 Apr 2020
आरबीआयकडून नाबार्डला २५ हजार कोटींची मदत जाहीर

मायक्रो बँकिंग क्षेत्रासाठी ५० हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. नाबार्डला आरबीआयने २५ हजार कोटींची मदत जाहीर केली आह. करोना व्हायरसचा छोटया आणि मध्यम उद्योगाने सर्वाधिक फटका बसला आहे. रिव्हर्स रेपो रेट २५ बेसिक पॉईंटने कमी करण्यात आला आहे. आता रिव्हर्स रेपो रेट ३.७५ टक्के असेल.

10:16 (IST)17 Apr 2020
संपूर्ण जगावर मंदीचे सावट आहे

जगभरात कच्चा तेलाच्या दरामध्ये घसरण होत आहे. जगामध्ये मोठी मंदी येण्याची शक्यता आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये चांगली स्थिती आहे. यावर्षी १.९ टक्के विकास दर राहण्याची शक्यता आहे. करोनाचे संकट संपल्यानंतर विकास दर ७.२ टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो.

10:13 (IST)17 Apr 2020
मानवतेसमोर करोना व्हायरसचं संकट


सध्या मानवतेसमोर करोना व्हायरसचं संकट आहे. या परिस्थितीत आर्थिक नुकसान कमीत कमी व्हावं यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.

10:10 (IST)17 Apr 2020
देशातील आर्थिक स्थितीवर आमची नजर

देशातील आर्थिक स्थितीवर आरबीआयची नजर आहे. बँक, वित्तीय कर्मचाऱ्यांचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आभार मानले .

10:03 (IST)17 Apr 2020
“राज्य सरकारची विनाकारण होणारी बदनामी टाळा”, अजित पवारांचं पालकमंत्र्यांना पत्र

करोना संकटकाळात गोरगरीब जनतेला रेशन दुकानांमधून दिल्या जाणाऱ्या धान्य वाटपाचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे. या वाटपात गैरप्रकार होऊ नये, धान्यवाटप सुरळीत, विनातक्रार व्हावं, वाटपाबाबत कुठलीही तक्रार आल्यास तिचं तात्काळ निराकरण करावं आणि शासनाची विनाकारण होणारी बदनामी टाळावी, यासाठी सर्वं पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तीश: लक्ष घालून जबाबदारी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना पत्र लिहून केलं आहे. (सविस्तर वृत्त)

09:56 (IST)17 Apr 2020
चीनमध्ये करोनाची लक्षणे नसलेल्यांकडून ४४ टक्के नागरिकांना Covid-19 ची लागण

करोनाची कुठलीही लक्षणे आढळून न आलेल्या व्यक्तींकडून चीनमध्ये ४४ टक्के नागरिकांना करोना व्हायरसची लागण झाली. चीनमध्ये एका अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी.

09:04 (IST)17 Apr 2020
करोना व्हायरसमुळे अमेरिकेत ३२९१७ नागरिकांचा मृत्यू

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार करोना व्हायरसमुळे अमेरिकेत आतापर्यंत ३२९१७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासात अमेरिकेत ४४९१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

08:54 (IST)17 Apr 2020
तीन हजाराहून जास्त करोना रुग्ण असणारं महाराष्ट्र ठरलं पहिलं राज्य

देशातील सर्वात जास्त करोनाबाधित महाराष्ट्रात आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात करोनाबाधितांच्या संख्या तीन हजारांच्या पुढे गेली. तीन हजारापेक्षा जास्त रुग्ण असणारं महाराष्ट्र पहिलंच राज्य ठरलं आहे. सोबतच मुंबईतील करोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या पुढे गेली आहे. गुरुवारी मुंबईत १७७ नव्या रुग्णांची भर पडली. राज्य सरकारने करोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याचं प्रमाण कमी झालं असून रुग्ण उपचार घेऊन बरे होण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं सांगितलं आहे. (सविस्तर वृत्त)

08:37 (IST)17 Apr 2020
आरबीआय गव्हर्नर सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेणार

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास आज सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. लॉकडाउनमुळे सध्या आर्थिक प्रगतीला मोठी खीळ बसली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते काय नवीन निर्णय जाहीर करतात ते महत्वपूर्ण ठरणार आहे.

07:34 (IST)17 Apr 2020
मुंबई-पुण्याबाहेर उद्योगांना लवकरच परवानगी

करोनाच्या रुग्णांची मोठी संख्या असलेल्या मुंबई परिसरातील महानगरपालिका-पुण्याचे क्षेत्र वगळून विषाणूचा अधिक प्रादुर्भाव नसलेल्या भागांत २० एप्रिलनंतर उद्योग सुरू करण्याचे संकेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. उद्योग सुरू करण्यासाठी कामगारांच्या सुरक्षित वाहतुकीची-राहण्याची व्यवस्था करण्याची अट उद्योजकांवर टाकण्यात येणार आहे. वाचा सविस्तर बातमी.

07:31 (IST)17 Apr 2020
भारतात २४ नमुन्यांमागे एक रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह

अन्य देशांमधील करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येचा विचार करता भारतात २४ जणांची Covid-19 ची चाचणी केल्यानंतर एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. आयसीएमआरकडून ही माहिती देण्यात आली. जपान, इटली, अमेरिका आणि यूके या देशांनी एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढण्यासाठी तुलनेने कमी चाचण्या केल्या आहेत.

07:27 (IST)17 Apr 2020
परिस्थितीत सुधारणा

करोना साथरोगाचे आक्रमण परतवून लावण्यासाठी राज्य सरकार आणि सरकारच्या यंत्रणांनी आक्रमकपणे के लेल्या लढाईला यश येऊ लागले आहे. मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्येत घट दिसून येत असून पूर्ण बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वाचा सविस्तर बातमी.

07:25 (IST)17 Apr 2020
टाळेबंदीमुळे मुद्रांक शुल्काचे ३०५० कोटींचे उत्पन्न बुडाले

राज्यभरात दररोज नऊ हजार दस्त नोंद होतात. दरवर्षी मार्च महिन्यात ३२०० कोटी, तर इतर महिन्यांमध्ये दर महिना सरासरी २५०० कोटी रुपयांचा महसूल शासनाला प्राप्त होतो, मात्र यंदा करोनामुळे १७ मार्चनंतर दस्त नोंदणीची कार्यालये बंद ठेवण्यात आली असल्यामुळे या विभागाचे आतापर्यंत तब्बल तीन हजार ५० कोटींपेक्षा अधिक उत्पन्न बुडाले आहे.