News Flash

Coronavirus: US, UK, रशिया, ऑस्ट्रेलिया, सौदी, चीनसहीत एकूण १० देश भारताला मदत करण्यास तयार

'भारताने आम्हाला लशी पुरवून मोठे औदार्य दाखवले होते, आता भारतात दुसरी लाट आली असताना...'

प्रातिनिधिक फोटो

करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतामध्ये विक्रमी संख्येने रुग्ण आढळून आल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी भारताला मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सौदी अरेबिया यासारख्या अनेक देशांनी भारताला मदत करण्यासंदर्भातील आश्वासन दिलं आहे. मागील अनेक आठवड्यांपासून भारतामधील लस निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी अडवणूक करणाऱ्या अमेरेकिनेही भारतात सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. ब्रिटननेही भारताच्या करोनाविरुद्धच्या लढाईत सोबत असल्याचं आणि शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन भारतातील उच्चायुक्तांच्या माध्यमातून दिलं आहे. जगभरातील दहा लहान मोठ्या देशांनी भारताला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

भारतात गेल्या चार दिवसांत दैनंदिन रुग्णवाढ ही तीन लाखांहून अधिक झाल्याने जगभरात तो चिंतेचा विषय झाला आहे. अनेक राज्यांत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांचे हकनाक बळी गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान यांनी ट्विटरवर भारतातील स्थितीबाबत चिंता व्यक्त केली असून करोना उद्रेकानंतर भारताला आवश्यक ती सर्व मदत आम्ही देऊ असे म्हटले आहे. या महाभयानक आपत्तीला सामोरे जात असलेल्या भारतीयांबाबत त्यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी अशाच भावना व्यक्त केल्या असून भारत हा आमचा भागीदार देश असल्याचे सांगून भारताला आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वाासन दिले आहे.

“करोनाला हरवण्यासाठीच्या या युद्धामध्ये युनायटेड किंग्डम भारतासोबत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स आणि व्हेंटिलेटर्स भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे,” असं ब्रिटनचे भारतातील राजदूत असणाऱ्या अॅलेक्स इलिस यांनी सांगितलं आहे.

युरोपीय मंडळाचे अध्यक्ष चार्लस मिशेल यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, युरोपीय समुदाय एकजुटीने भारतीय लोकांच्या पाठीशी आहे. ही केवळ भारताची एकट्याची लढाई नसून संयुक्त लढाई आहे. ८ मे रोजी भारत व युरोपीय समुदायाची बैठक होत असून त्यावेळी यावर चर्चा होईलच पण त्याआधी आम्ही मदत देण्यासही तयार आहोत.

चीनचे परराष्ट्र मंत्री झाओ लिजियान यांनी सांगितले की, आम्ही भारताशी संपर्क साधला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही भारतातील परिस्थितीबाबत सहवेदना व्यक्त केली असून या आव्हानाशी जागतिक पातळीवर सामना करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानमधील एइधी फाऊण्डेशनने भारताच्या मदतीसाठी ५० रुग्णवाहिका पाठवण्याची तयारी दर्शवली असून त्यासंदर्भातील पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवण्यात आलं आहे.

सिंगापूरने चार क्रायोजेनिक ऑक्सिजन टाक्या पाठवल्या असून संयुक्त अरब अमिरातीही भारतीय दूतावासाच्या मदतीने ऑक्सिजनच्या टाक्या पाठवण्याच्या विचारात आहे. युरोपीय समुदाय व रशिया यांनी ऑक्सिजन संबंधित व इतर औषधांची मदत भारताला देण्याचे ठरवले आहे. स्वीडिश हवामान कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्ग हिने म्हटले आहे की, जागतिक समुदायाने ताबडतोब पुढे येऊन भारताला मदत करावी.

ऑस्ट्रेलियानेही दाखवली तयारी…

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री मॅरिसे पायने यांनीही भारताबाबत सहवेदना व्यक्त केली असून, ‘भारताने आम्हाला लशी पुरवून मोठे औदार्य दाखवले होते, आता भारतात दुसरी लाट आली असताना आम्ही त्या देशाला मदत करण्यास तयार आहोत’, असे स्पष्ट केले आहे.

सौदी अरेबियाकडून वायूपुरवठा

सौदी अरेबियाने ८० मेट्रिक टन ऑक्सिजन भारताला पाठवला असून अदानी समूह व लिंडे कंपनी यांच्या सहकार्यातून हा ऑक्सिजन भारतात येणार आहे. रियाध येथील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, अदानी समूह व मे. लिंडे कंपनी यांच्या मदतीने ऑक्सिजन भारतात पाठवण्यात येत आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितले की, ८० मेट्रिक टन ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकरमध्ये भरून भारतात आणला जात आहे. दम्मम ते मुंद्रा या मार्गाने या टँकरचा प्रवास सुरू आहे. रियाधमधील भारतीय दूतावासाचे आम्ही आभारी आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 9:00 am

Web Title: coronavirus 10 nations including usa uk australia russia china saudi offers help to india scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 हृदयद्रावक! बेड नसल्याने तीन रुग्णालयांनी दिला नकार, रिक्षामध्ये पत्नी तोंडाने ऑक्सिजन देत राहिली पण…
2 करोना संकटात पश्चिम बंगालमध्ये आज सातव्या टप्प्यासाठी मतदान
3 Oscar 2021: ऑस्कर 2021 पुरस्कारांमध्ये ‘नोमडलँड’ची वर्णी, सर्वोत्कृष्ट सिनेमासह, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि दिग्दर्शकाचा पुरस्कार