देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असणाऱ्या लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु आहे. मात्र लॉकडाउन सुरु झाल्यापासून स्थलांतरि कामागारांनी आपल्या राज्यात परत जाण्याचा मार्ग निवडला असून अनेकजण सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असल्याने पायी चालतच आपल्या मूळगावी निघाले आहेत. याच स्थलांतरित कामगारांच्या हृदयद्रावक प्रवासाच्या बातम्या आता समोर येत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसीमधून एक ११ वर्षांचा मुलगा आपल्या कुटुंबासहीत बिहारला जाण्यासाठी निघाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा ११ वर्षांचा मुलगा स्वत: सायकल रिक्षा चालवत आपल्या आई-वडिलांना गावी घेऊन निघाला आहे.

वाराणसीमध्ये वास्तव्यास असलेलं हे कुटुंब आपला सगळा संसार सायकल रिक्षामध्ये टाकून बिहारमधील आरिया जिल्ह्यामधील मूळगावी निघालं आहे. ही सायकल हा मुलगा आणि त्याचे वडील आलटून पालटून चालवत असल्याचे सांगितले जात आहे. वयस्कर वडील थकल्यानंतर हा ११ वर्षांचा मुलगा उंची पूरत नसतानाही सायकल चालवत चालवत आपल्या घराच्या दिशेने निघाल्याचा दावा सोशल नेटवर्किंगवर केला जात आहे. या मुलाचे सोशल मिडियावर कौतुक होत असून अनेकांनी या मुलाला आजचा श्रावणबाळ म्हटलं आहे. अभिनेत्री रिचा चड्ढानेही हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ एका गाडीमधून शूट करण्यात आला आहे. या मुलाला सायकल चालवताना पाहून गाडीमधून व्हिडिओ शूट केल्यानंतर पुढे जाऊन गाडी थांबवून व्हिडिओ काढणारी व्यक्ती या मुलाची चौकशी करते. त्यावेळी हा मुलगा आपण वाराणसीवरुन आरियाला चालल्याचे सांगतो. वाराणसीमध्ये करण्यासाठी काहीच नसल्याने मी कुटुंबासहित मूळगावी जात असल्याचं हा मुलगा सांगतो. यानंतर व्हिडिओ शूट करणारी व्यक्ती या मुलाला ५०० रुपये मदत म्हणून देताना दिसते.

देशामध्ये २५ मार्चपासून लॉकडाउन सुरु आहे. मिळेल त्या साधनांचा वापर करुन आपल्या गावी पोहचण्याचा प्रयत्न देशभरातील स्थलांतरित कामगार करताना दिसत आहेत. या स्थलांतरित कामगारांची व्यथा सांगणारे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.