नवी दिल्ली : देशभरात गेल्या चोवीस तासांमध्ये १३ हजार ५८६ करोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. आत्तापर्यंत एका दिवसात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. त्याआधी दिवसभरात १२ हजार ८८१ नवे रुग्ण आढळले. एकूण करोना रुग्णांची संख्या ३ लाख ८० हजार ५३२ झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ३३६ मृत्यू झाले असून एकूण मृत्यू १२ हजार ५७३ झाले आहेत.

गेल्या चोवीस तासांमध्ये १०,३८६ रुग्ण बरे झाले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ४ हजार ७१० झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५३.७९ टक्के आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या बरे झालेल्या रुग्णांपेक्षा कमी म्हणजे १ लाख ६३ हजार २४८ इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून उपचाराधीन व बरे झालेल्या रुग्णांमधील संख्यात्मक फरकही वाढू लागला आहे. हे पाहता करोनाविरोधात अवलंबलेले धोरण परिणामकारक असल्याचे दिसते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

देशभरात ९६० वैद्यकीय प्रयोगशाळा कार्यरत असून गेल्या चोवीस तासांमध्ये १ लाख ७६ हजार ९५९ नमुना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ७.६७ टक्के नमुने करोनाबाधित आहेत. आत्तापर्यंत ६४ लाख २६ हजार ६२७ नमुना चाचण्या झाल्या आहेत. प्रतिदिन ३ लाख नमुना चाचण्या करण्याची क्षमता आहे.

खासगी रुग्णालयांत उपचार स्वस्त

निती आयोगाने दिल्लीतील खासगी रुग्णालयांमध्ये करोनाच्या उपचार दरांवर मर्यादा आणली आहे. करोनावर आता तुलनेत स्वस्तात उपचार घेणे शक्य होणार असल्याने दिल्लीतील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासगी रुग्णालयातील उपचार दरांमध्ये एकतृतीयांश कपात करण्याची सूचना निती आयोगाने केली आहे. खासगी रुग्णालयांमधील ६० टक्के खाटा करोना रुग्णांसाठी राखीव ठेवल्या जात आहेत.

विलगीकरण खाटांसाठी पीपीई व औषधांसह प्रतिदिन खर्च २५ हजारांवरून आता १० हजारांवर आला आहे. अतिदक्षता विभागात (विनाकृत्रिम श्वसनयंत्र) प्रतिदिन खर्च ४३ हजारांवरून १५ हजार रुपये तर अतिदक्षता विभागात (कृत्रिम श्वसनयंत्रासह) प्रतिदिन खर्च ५४ हजारांवरून १८ हजार रुपयांवर आला आहे. दिल्लीतील करोना रुग्णांची संख्या ५० हजार झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल २,८७७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. एकूण मृत्यू १९६९ झाले आहेत.

राजधानीत करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने २४२ नियंत्रित विभागांमध्ये घराघरात जाऊन २.३ लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. प्रामुख्याने नियंत्रित विभागांमध्ये रॅपिड अ‍ॅण्टिजिन नमुना चाचणी घेतली जात असून गुरुवारी दिवसभरात ७ हजार चाचण्या झाल्या. हे प्रमाण आणखी वाढवले जाणार आहे. या चाचणीचे निष्कर्ष १५ ते ३० मिनिटांत समजत असल्याने व ही चाचणी तुलनेत स्वस्त असल्याने या चाचणीवर भर दिला जात आहे.

दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांची प्रकृती खालावली

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांची प्रकृती खालावली असून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. बुधवारी जैन यांची दुसरी नमुना चाचणी सकारात्मक आल्याने त्यांना करोनाची बाधा झाल्याने स्पष्ट झाले. दोन दिवसांनंतर शुक्रवारी त्यांना न्यूमोनियाही झाल्याचे तपासणीत आढळले. त्यांच्यावर रक्तद्रव उपचार पद्धतीचा वापर केला जाणार आहे. जैन यांना साकेत येथील मॅक्स या खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याआधी त्यांना राजीव गांधी सुपर स्पेशालिटी या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.