जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील चोवीस तासांत देशभरात करोनाचे 2 हजार 487 नवे रुग्ण आढळले असून, 83 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 40 हजार 263 वर पोहचली आहे. व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

देशभरातील एकूण 40 हजार 263 करोनाबाधित रुग्णांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले 28 हजार 070 रुग्ण, रुग्णालयातून उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले 10 हजार 887 जण तर करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 हजार 306 जणांचा समावेश आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात खबरदारीचे सगळे उपाय योजले जात आहेत. लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला असला तरीही सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आवाहनही करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने कालच करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाउन वाढवण्यात आल्याची घोषणा केली. आणखी दोन आठवडे म्हणजेच १७ मेपर्यंत देशभरात लॉकडाउन कायम असणार आहे. त्यानंतर काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणा आहे. जे राज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरित मजूर आहेत त्यांना त्यांच्या गावी जाता यावं म्हणून बस सेवा सुरु करण्यात आली आहे. काही विशेष ट्रेनही सोडण्यात आल्या आहेत.