जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील चोवीस तासांत करोनामुळे 31 जणांचा मृत्यू झाला. तर 1 हजार 324 नवे रुग्ण आढळले आहेत.  देशातील करोनाबाधितांचा एकूण आकडा 16 हजार 116 वर पोहचला आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 13 हजार 295 रुग्ण,  रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेले 2 हजार 302 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 519 जणांचा समावेश आहे.

सध्या संपूर्ण देशभरात करोना विषाणूने थैमान घातलं आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलेलं आहे. आजही देशातील महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये याकरता, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या चार राज्यांनी मेडीकल दुकानांना सर्दी-तापाची औषधं घेणाऱ्या व्यक्तींची माहिती, नाव व पत्ता घेण्याचे आदेश दिले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्दी आणि तापाची लक्षणं असलेल्या रुग्णांची राज्य सरकार चौकशी करण्याच्या तयारीत आहे.

. जगभरात करोनाबाधितांच्या २3 लाख 29 हजारांहून अधिक प्रकरणांची नोंद झाली असून, त्यापैकी जवळजवळ निम्मे रुग्ण युरोपातील आहेत. जगभरातील करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या दीड लाखांच्या पुढे गेली आहे. http://www.worldometers.info च्या माहितीनुसार करोना व्हायरसमुळे जगभरात एक लाख ६० हजार ७२१ जणांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूचा सर्वाधिक फटका युरोपला बसला आहे. तेथे १२ लाख लोक करोनाबाधित असून, जवळपास एक लाख जण मृत्युमुखी पडले आहेत. तर पाच लाख ९५ हजार ४३३ जणांनी करोनावर मात केली आहे.