जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे.  मागील चोवीस तासांत देशभरात 3 हजार 320 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 95 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 59 हजार 662  वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 39 हजार 834 रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 17 हजार 847 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 हजार 981 जणांचा समावेश आहे.

करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग पुन्हा वाढला असून तो १२ दिवसांवरून आता १० दिवसांवर आला आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये केंद्राची पथके सातत्याने पाहणी करत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी शुक्रवारी दिली.

टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही केला जात आहे. त्याअंतर्गत मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू, पर्यटक आदींना गावी पोहोचवण्यासाठी बस व रेल्वेंना अनुमती देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत रेल्वे मंत्रालयाने २२२ विशेष रेल्वे सोडल्या असून अडीच लाखांहून अधिक लोकांच्या प्रवासाची व्यवस्था केली आहे, अशी महिती केंद्रीय गृह संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी शुक्रवारी दिली.