तामिळनाडूमधील कोयंबतूरमध्ये मागील अनेक दशकांपासून एक रुपयांना इडली विकणाऱ्या ८५ वर्षीय आजीबाई देशभरातील अनेकांना ठाऊक आहेत. मध्यंतरी महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी या महिलेला चूल देऊन मदत केल्यानंतर ही महिला चर्चेत आली होती. त्यानंतर आता लॉकडाउनच्या कालावधीमध्ये स्थलांतरित कामगारांना पोटभर जेवण मिळावे म्हणून या आजीबाईंनी आपला एक रुपयांमध्ये इडली विकण्याचा उपक्रम सुरुच ठेवल्याने त्या चर्चेत आल्या आहेत. यासंदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिलं आहे.

कोयंबतूरमधील अलांडुरई येथे राहणाऱ्या के. कमलाथल या मागील ३० वर्षांपासून आपल्या घराबाहेरच्या जागेवर एक छोटेखानी इडलीचे दुकान चालवतात. मागील ३० वर्षांमध्ये त्यांनी आपल्या इडलीची किंमत बदलेली नाही. तीन दशकांमध्ये महगाई वाढली असली तरी कमलाथल यांनी त्यांच किंमती कायम ठेवल्या आहेत. जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ घेता यावा म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगतात. आता त्यांच्या या दुकानावर स्थलांतरीत कामगारांचीही गर्दी होताना दिसत आहे. एकीकडे करोनाच्या पार्श्वभूमीवर साठेबाजी करुन आणि किमती वाढवून ग्राहकांची लूट केली जात असतानाच दुसरीकडे कमलाथल यांचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे त्यांच्या हातून अधिक अधिक स्थलांतरीत कामगारांच्या पोटाला चार घास मिळावेत म्हणून अनेकांनी सांबार आणि इडलीशी संबंधित सामान देण्याची तयारी दर्शवली आहे.

आणखी वाचा- “मजूर रस्ते आणि रेल्वे रुळांवरुन चालत प्रवास करणार नाहीत याची खबरादारी घ्यावी”; केंद्राचा राज्यांना आदेश

कमलाथल यांनी आपण इडल्यांची मागणी वाढली असली तरी मजुरांना परवडावे म्हणून आपण एक रुपयालाच इडली विकाणार असल्याचे इंडिया टुडेशी बोलताना स्पष्ट केलं आहे. “करोनामुळे सध्या परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. मात्र या परिस्थितीमध्येही मी एक रुपयामध्ये इडली उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक कामगार येथे अडकून पडल्याने इडलीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र मदतीचे हातही पुढे येत आहेत. त्यामुळे या मदतीच्या जोरावर मी सर्वांना एक रुपयात इडली उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत आहे,” असं कमलाथल सांगतात.

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये या आजींची इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरु होती. त्यांनी एक रुपयात इडली विकण्याचा जो संकल्प मागील ३० वर्षांपासून सुरु ठेवला आहे त्याचे सर्वांनी कौतुक केलं होतं.  आता करोनाच्या पार्श्वभूमीवर त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. स्वस्तात इडली विकण्याबरोबर त्या मजुरांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासंदर्भातही धडे देत असतात. लांब बसून खा, अंतर ठेवा असा सल्ला त्या आपल्या गिऱ्हाईकांना आवर्जून देतात.