करोनानं जगभर थैमान घातलं आहे. चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या या आजाराशी संपूर्ण जग झुंज देत आहे. करोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीही आहे. त्यातच प्राण्यांनाही या रोगांची लागणं होतं असल्यानं आणखी चिंतेत भर टाकली आहे. अशातच एका मांजरीला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना बेल्जियममधील असून, करोनाग्रस्त घरमालकाच्या संपर्कात आल्यानं मांजरीला संसर्ग झाला आहे.

‘गेल्या आठवड्यात एका मांजरीला करोना झाल्याचं निष्पन्न झालं. घरमालकाला करोना झाला. त्याच्या संपर्कात आल्यानं मांजरीलाही संसर्ग झाला,’ असं ‘एएफपी’ वृत्त संस्थेनं बेल्जियममधील आरोग्य विभागाच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच हाँगकाँगमध्ये दोन कुत्र्यांना करोनाची लागण झाली होती. करोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १७ कुत्रे आणि आठ मांजरींची तपासणी केल्यानंतर ही बाब समोर आली होती. हाँगकाँगमधील घटनेचा हवाला देत बेल्जियमच्या अन्न सुरक्षा यंत्रणेनं म्हटलं आहे की, हाँगकाँगमध्ये कुत्र्यांना काही लक्षणं दिसली नव्हती. मात्र, या मांजरीमध्ये करोनाची लक्षणं दिसून आली. मांजरीला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याचबरोबर तिला अपचन होऊ लागलं होतं’

प्राण्यांमुळे माणसांना करोनाचा संसर्ग होतो का?

पाळीव प्राण्यांना करोना होत असेल तर माणसांनाही होण्याची भीती असते का? असा प्रश्नही यानिमित्तानं उपस्थित होऊ लागला आहे. माणसांबरोबर तो डुक्कर, बकरी, पाळीव जनावरं, मांजर, कुत्रा, उंट यांना होणारा करोनाचा एक विशिष्ट विषाणू आहे. तर करोना बाधित प्राण्यांपासून माणसाला संसर्ग होणारा करोनाचा विषाणू दुर्मिळ आहे. काही करोना विषाणू आहेत, ज्यांची पाळीव प्राण्यांना लागण होते. पण माणसांना होत नाही, असं साथरोग नियंत्रण केंद्रानं म्हटलेलं आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेनं प्राण्यांपासून माणसांना करोना होत नाही. तसा कोणताही पुरावा अजूनतरी मिळालेला नाही, असं स्पष्ट केलं आहे. हाँगकाँगमध्ये कुत्र्यांना करोनाची लागण झाल्याच्या घटनेनंतर जागतिक आरोग्य संघटनेनं हे नमूद केलं होतं.