करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भारतात दिवसाला तीन लाखांच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटकसारख्या राज्यांनी लॉकडाउन आणि कठोर निर्बंधांच्या मदतीने करोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. याच कठोर निर्बंधांमध्ये लग्नांचाही समावेश असून महाराष्ट्रात तर करोनाची परिस्थिती लक्षात घेता २५ पाहुण्यांच्या उपस्थितीत २ तासांमध्ये लग्न समारंभ उरकून घेण्यासंदर्भातील निर्देश देण्यात आलेत. एकीकडे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नियम असतानाच दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये अगदीच आगळावेगळा विवाह पार पडलाय. येथे लग्नाच्या आधीच नवरा मुलगा कोव्हिड पॉझिटिव्ह आल्याने चक्क पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट) कीट घालून वधू-वराने सात फेरे घेत लग्न केलं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये वधू आणि वर यज्ञाभोवती पीपीई कीट घालून सप्तपदी घेताना दिसत आहेत. लग्न लावून देणारे तीन इसमही पीपीई कीटमध्ये दिसून येत आहेत. या दोघांनाही पीपीई कीटवरच हारही घातल्याचे दिसत आहे. रतलाममध्ये हा आगळावेगळा विवाहसोहळा पार पडलाय.

“नवरा मुलगा कोव्हिड पॉझिटिव्ह आहे. आम्ही येथे हे लग्न थांबवण्यासाठी आलो होतो. मात्र लग्न करणाऱ्यांनी केलेली विनंती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमांचे पालन करुन लग्न करण्यासाठी दिलेली परवानगी यामुळे आम्ही कारवाई कील नाही. करोनाचा प्रादुर्भाव इतरांना होऊ नये म्हणून या जोडप्याला पीपीई कीट घालण्यास सांगण्यात आलं,” अशी माहिती रतलामचे तहसीलदार नविन गर्ग यांनी दिली.

या लग्नाचा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. लग्नसाठी काही दिवस थांबता आलं नसतं का असा प्रश्नही काहींनी विचारलाय.