क्वारंटाइन सेंटरमध्ये असणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याना एका व्यक्तीनं करोना व्हायरस निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र देतो म्हणून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासाठी त्या व्यक्तीने त्यांच्याकडे २५ हजार रुपयांची मागणी केली होती.

फसवणूक करणाऱ्यांना काळ किंवा वेळेचे कोणतेही भान नसते. सध्या देशात करोना व्हायरस या महामारीचा प्रादुर्भाव वाढत असतानाही ठगांनीही पैसे उकळण्यासाठी नवनव्या आयडिया वापरल्या आहेत. देशाबाहेर किंवा राज्याबाहेरून आलेल्या नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्रं दाखवणं बंधनकारक आहे. आशा बाहेरून आलेल्यांना बनावट प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या ठगांचा सध्या सुळसुळाट झाला आहे. बंगळुमधील एका वृद्ध दाम्पत्याला ‘करोना निगेटिव्ह सर्टिफिकेट’ मिळवून देतो असं सांगून २५ हजार रुपये उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ठगाला पोलिसांनी अटक केली आहे. वृद्ध जोडप्याच्या वेळीच लक्षात आल्यामुळे त्या ठगाला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले.

राजधानी दिल्लीहून जवळपास ७० जण बंगळुरूत पोहचले. यातील अनेकजणांना स्वखर्चाने इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन केले जात आहे. यासाठी काही पैसे आकारून हॉटेल्सही क्वारंटाइन सेवा उपलब्ध करून देत आहेत. अशाच एका खासगी हॉटेलमध्ये दिल्लीहून परतलेलं एक वृद्ध दाम्पत्य क्वारंटाइनसाठी पोहचले होते. या हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर मदत करण्याच्या बहाण्याने कृष्णा गौडा (५६ वर्ष) या व्यक्तीने संपर्क साधला. गौडाने या दाम्पत्याना किती दिवसांपासून क्वारंटाइन आहात? असा प्रश्न विचारला. त्या वृद्ध दाप्मत्याला कृष्णाची भामटेगिरी तात्कळ लक्षात आली. त्यांनीही चलाखी करत त्याचं सर्व बोलणं स्मार्टफोनमध्ये रेकॉर्ड केलं.

कृष्णाच्या प्रश्नावर ते दाम्पत्य म्हणाले की, १४ दिवसांसाठी आम्ही १९ हजार सहाशे रूपये भरले आहेत. त्यावर कृष्णा म्हणाला की, मला २५ हजार रूपये द्या तुम्हाला ‘करोना निगेटिव्ह सर्टिफिकेट’ मिळवून देतो आणि इथून बाहेर काढतो. यानंतर त्या दाम्पत्याने हा सर्व प्रकार बीबीएमी मेडिकल ऑफिसर डॉ. नंदा यांना फोन करून सांगितला आणि कृष्णाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत कृष्णा गौडाला अटक केली.