करोनाने जगभरात अनेक लोकांचा जीव घेतला आहे. अनेक कुटुंबानी आपल्या जवळची व्यक्ती गमावली आहे. करोनामुळे मृत्यू झाल्याने अनेकांना तर अंत्यदर्शनही घेता येत नाही. पण अमेरिकेत तर एका व्यक्तीला आपल्या पत्नीचा करोनामुळे मृत्यू झाल्याचीही कल्पना नव्हती. कोमातून बाहेर आल्यानंतर त्याला आपली पत्नी आता या जगात नसल्याची माहिती मिळाली.

६९ वर्षीय लॉरेन्स नोक्स यांना व्हेटिंलेटवर ठेवण्यात आलं होतं. १० एप्रिल रोजी डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने व्हेंटिलेटर काढण्याचा निर्णय घेतला. लॉरेन्स मेरिलँड येथील एका रुग्णालयात काम करत होते. करोनाने थैमान घातल्याने ते काम करत असलेल्या रुग्णालयातील ९५ पैकी ८४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

लॉरेन्स यांना ३० मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात आला होता. एक आठवडा ते कोमात होते. पण एका आठवड्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि श्वसनातही कोणता अडथळा निर्माण होत नव्हता. शुद्धीत आल्यानंतर लॉरेन्स वारंवार एका व्यक्तीची विचारणा करत होते. ती म्हणजे त्यांची २४ वर्षीय पत्नी मिन्नेट नोक्स.

लॉरेन्स वारंवार आपल्या पत्नीसंबंधी विचारत होते. पण डॉक्टर त्यांना काहीच उत्तर देत नव्हते. पम जेव्हा त्यांना असह्य होऊ लागलं तेव्हा मात्र कुटुंबाने सत्य सांगण्याचा निर्णय घेतला.

लॉरेन्स यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर मिन्नेट यांना खूप थकल्यासारखं वाटू लागलं होतं. त्यांना त्यांच्या पतीची चिंता सतावत होते. क्वारंटाइन असल्याने त्या आपल्या कुटुंब किंवा मित्र-मैत्रिणींनाही भेटू शकत नव्हत्या. आपल्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी ७ एप्रिल रोजी मिन्नेट यांनी ह्रदयविकाराचा झटका आला आणि झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे.

पत्नीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर लॉरेन्स यांची प्रकृती पुन्हा एकदा खराब झाली असून त्यांनी आपल्यावर वैद्यकीय उपचार थांबवावेत अशी विनंती केली आहे. आपल्या कुटुंबाला वारंवार ते आपल्या संपत्तीची माहिती देत असून काय करायचं यासंबंधी सांगत आहेत. अखेर पत्नीच्या मृत्यूनंतर आठ दिवसांनी १५ एप्रिल रोजी लॉरेन्स यांचंही निधन झालं.