देशामधील करोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच डॉक्टर आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस कामामध्ये व्यस्त आहेत. दिल्लीमध्येही करोनाग्रस्तांचा आकडा वाढल्याने डॉक्टरांचे काम वाढले आहे. याच डॉक्टरांना दिलासा देण्यासाठी दिल्लीतील ताज आणि लिला हॉटेलने महत्वाचा निर्णय घेतला आहे. गुरु तेजबहादूर आणि राजीव गांधी सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयामध्ये करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी कारकारडोमा येथील हॉटेल लिलामध्ये राहण्याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. तर टाटा ग्रुपचे मालक असणाऱ्या रतत टाटा यांच्या मालिकच्या इंडिय हॉटेल्स कंपनी अंतर्गत येणाऱ्या ताज हॉटेलने सर्व रुग्णालयांमध्ये करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जेवणाची जबाबदारी उचलली आहे. काही दिवसांपूर्वीच रतन टाटा यांनी करोनाविरुद्ध लढण्यासाठी ५०० कोटी आणि टाटा सन्सकडून एक हजार कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती.

दिल्ली सरकारने बाराखंबा रोड येथील हॉटेल ललितमध्ये लोकनायक आणि जीबी पंत रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी १०० रुम बूक केल्या होत्या. मात्र आता लिला हॉटेलने मदतीचा हात पुढे केल्याने इतर दोन रुग्णालयांमधील डॉक्टर्सच्या राहण्याची सोय झाली आहे. तर दुसरीकडे दिल्लीतील सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि रुग्णांना ताज हॉटेलकडून जेवण पुरवलं जाणार आहे.

याआधीही मुंबईमध्ये रतन टाटांच्या मालकीच्या असणाऱ्या ताज ग्रुपच्या हॉटेल्सने डॉक्टरांना आणि आरोग्य विभागाच्या कार्मचाऱ्यांना जेवणाची पाकिटं वाटली होती. मुंबई महानगरपालिकेनेच यासंदर्भात ट्विटवरुन माहिती दिली होती. महापालिकेने ताज कॅटर्सच्या मदतीने शहरातील सरकारी रुग्णालयांमधील रुग्णांना, डॉक्टरांना, नर्सना आणि आरोग्य सेवेतील इतर कर्मचाऱ्यांना अन्नाची पाकिटं वाटल्याचं मुंबई महापालिकेने म्हटलं होतं.

विमानात दिलं जात त्याप्रमाणे या पाकिटांमध्ये सॅलेड, भात, डाळ, भाजी, पाव, कॅडबरी, अमुल बटर, पाण्याची बाटली अशा गोष्टी होत्या.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उद्योगपती हर्ष गोयंका यांनी या गोष्टीचं ट्विटवरुन कौतुक केलं होतं.

रतन टाटा यांनी ५०० कोटींची मदत जाहीर करण्याआधीच टाटा ग्रुपने आपल्या कंपनीच्या सर्व तात्पुरत्या कर्मचाऱ्यांचे आणि हातावर पोट असणाऱ्या कामागारांचे पूर्ण वेतन देण्याच निर्णय घेतला होता. देशातील टाटा उद्योग समुहाच्या सर्व कर्मचाऱ्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा पूर्ण पगार देण्यात येईल अशी घोषणा कंपनीने केली होती. विशेष म्हणजे लॉकडाउनदरम्यान कंपन्या बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी सर्वांना पगार देण्यात येणार आहे.