देशामध्ये दिवसोंदिवस करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. असं असतानाच आता भाजपाच्याच एका खासदाराने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात मत नोंदवलं आहे. गुजरातमधून करोना हद्दपार करायचा असेल, तर मुख्यमंत्र्यांना हटवा अशी मागणी स्वामी यांनी केली आहे.

शनिवारी (९ मे २०२०) देशातील करोनाग्रस्तांचा आकडा साठ हजाराच्या आसपास पोहचला आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात आहेत. गुजरातमध्ये आतापर्यंत (९ मे २०२० दुपारी साडेतीन वाजेपर्यंत) करोनाचे सात हजार ४०० रुग्ण अढळून आले आहेत. देशभरातील एकूण करोना रुग्णांच्या १२.५ टक्के रुग्ण हे केवळ गुजरातमध्ये आहेत. तर करोनामुळे गुजरातमध्ये मरण पावलेल्यांची संख्या ४५० हून अधिक आहे. गुजरातमध्ये एकूण रुग्णसंख्येच्या सहा टक्के रुग्णांचा मृ्त्यू होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. ही टक्केवारी देशातील करोनाग्रस्तांच्या संख्येचा विचार करता अधिक आहे. तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये करोनाचे प्रत्येकी सहा हजारांच्या आसपास रुग्ण आहेत. मात्र या राज्यांमध्ये करोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या ७० हूनही कमी आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्री पदी नियुक्त करावं अशी मागणी स्वामी यांनी ट्विटवरुन केली आहे. “गुजरातमध्ये करोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी करायची असल्यास आनंदीबेन पटेल यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवावे,” असं स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

गुजरातमधील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजय रुपानी यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवून त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हाती राज्याचे नेतृत्व दिलं जाण्यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहेत. मात्र मांडविया यांनी स्वत:च ट्विट करुन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “संपूर्ण जग करोनाशी लढा देत आहे. गुजरातमध्येही तीच परिस्थिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री रुपानी हे चांगल्याप्रकारे नेतृत्व करत आहेत. अशावेळी मुख्यमंत्री बदलण्यासंदर्भात अफवा पसरवणे जनतेच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही. अशाप्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका असं मी लोकांना आवाहन करतो,” असं मांडविया यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

कोण आहेत आनंदीबेन पटेल?

२०१४ च्या लोकसभा निवडणुकींनंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनाम देऊन पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्याचवेळी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी आनंदीबेन पटेल यांनी वर्णी लागली. मोदींनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आनंदीबेन पटेल यांची निवड केली होती. त्यांच्या माध्यमातून गुजरातला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या होत्या. २०१७ मध्ये आनंदीबेन यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांना २०१८ साली मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदी नियुक्त करण्यात आलं.